*सीसीटीव्ही, तांत्रिक तपास आणि मानवी कौशल्याच्या आधारे सिंधुदुर्ग एलसीबीची कारवाई; आरोपी देवगड पोलिसांच्या ताब्यात
देवगड :
शिरगाव-साटमवाडी येथे वयस्कर महिलेच्या गळ्यातील तब्बल १ लाख ७५ हजार रुपये किमतीची २५ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ हिसकावून चोरी करणाऱ्या आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने डोंबिवली येथून शिताफीने ताब्यात घेतले. तन्मय राजेंद्र साटम (वय २९, मूळ रा. शेवरे, शिरगाव, ता. देवगड, सध्या रा. डोंबिवली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
शिरगाव-साटमवाडी येथे १६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जयश्री सदाशिव बावसकर यांच्या गळ्यातील सोन्याची माळ अज्ञात व्यक्तीने हिसकावून नेली होती. याप्रकरणी १७ ऑगस्ट रोजी देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि मानवी कौशल्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटविली. आरोपी डोंबिवलीतील गणेशनगर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने तेथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे, आरोपीवर यापूर्वी ठाणे पोलीस आयुक्तालयातील शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा असून त्या प्रकरणातही तो पाहिजे आरोपी असल्याचे तपासात समोर आले आहे.
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी २ सप्टेंबर रोजी देवगड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल पाटील, एएसआय राजेंद्र जामसंडेकर, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर तवटे, आशिष गंगावणे आणि किरण देसाई यांच्या पथकाने केली.
