You are currently viewing साहित्य चळवळीला नवसंजीवनी मिळेल : ज्येष्ठ कवी प्रकाश घोडके

साहित्य चळवळीला नवसंजीवनी मिळेल : ज्येष्ठ कवी प्रकाश घोडके

श्रावणधारा जिल्हास्तरीय काव्यसंमेलन उत्साहात

अहिल्यानगर/ (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार ) : “महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा अहिल्यानगरची धुरा नवनिर्वाचित अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे यांनी स्वीकारल्यानंतर नव्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील साहित्य चळवळीला निश्चितच नवसंजीवनी मिळेल. साहित्य परिषदेमार्फत वर्षभर विविध साहित्यिक उपक्रमांचे नियोजन करून अधिकाधिक साहित्यिक व सभासदांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी प्रकाश घोडके यांनी केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा अहिल्यानगरच्या वतीने चांदबिबी महाल परिसरात आयोजित जिल्हास्तरीय ‘श्रावणधारा’ काव्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. निसर्गरम्य वातावरणात झालेल्या या काव्यसंमेलनास जिल्हाभरातील कवी, साहित्यिक व रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी इतिहासतज्ज्ञ प्रा. डॉ. नवनाथ वाव्हळ, मसाप शाखा अहिल्यानगरचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, काव्यसंमेलन संयोजक राजेंद्र उदागे, कार्याध्यक्ष राजेंद्र चोभे, प्राचार्य विश्वासराव काळे, प्रा. रवींद्र देवडे, सहकार्यवाह शिवाजी साबळे, उपाध्यक्ष डॉ. श्याम शिंदे, प्रा. रवींद्र काळे, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी, कवयित्री शर्मिला गोसावी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना कविवर्य प्रकाश घोडके म्हणाले की, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी साहित्यविश्वात नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर साहित्य चळवळीला व्यापक स्वरूप देण्याची गरज आहे. आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अहिल्यानगर जिल्ह्यातील साहित्यिकांचे प्रतिनिधित्व ठळकपणे दिसले पाहिजे. त्यासाठी मसापची अहिल्यानगर शाखा अधिक व्यापक आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करेल”.

इतिहासतज्ज्ञ प्रा. डॉ. नवनाथ वाव्हळ यांनी चांदबिबी महाल आणि परिसराचा ऐतिहासिक वारसा, त्याचे महत्त्व तसेच या परिसराशी निगडित ऐतिहासिक घटनांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. ऐतिहासिक आणि निसर्गरम्य वातावरणात रंगलेल्या काव्यसंमेलनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

मसापचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे यांनी आपल्या मनोगतापूर्वी एक हृदयस्पर्शी कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. साहित्यिकांनी एकदिलाने एकत्र येऊन साहित्यिक उपक्रम राबविल्यास जिल्ह्यातील साहित्य चळवळीला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होईल, असे त्यांनी सांगितले.

कवयित्री शर्मिला गोसावी यांनी सूत्रसंचालन केलेल्या काव्यसंमेलनात डॉ. रमेश वाघमारे, सुभाष सोनवणे, स्वाती ठुबे, रामदास कोतकर , सचिन चव्हाण, कानवडे महाराज, बाळासाहेब मंतोडे, राहुल शिंदे, शर्मिला रणधीर, प्रा. बबनराव गिरी, नजमा शेख, सुरेखा घोलप, प्रा. डॉ. अनिल गर्जे, बाळासाहेब शेंदुरकर, बाळासाहेब देशमुख, स्वाती काळे, एम. पी. दिवाण, प्रा. रवींद्र काळे, शाहीर वसंत डंबाळे, प्रतिभा बोबे, निरु जगताप, आदित्य गोरे, शिवाजी साळवे, रज्जाक शेख, आनंदा साळवे, सुनील गोसावी यांच्यासह अनेक कवींनी आपल्या विविधांगी रचना सादर केल्या.

कवितांमध्ये सामाजिक वास्तव, निसर्ग, प्रेम, माणुसकी, ग्रामीण जीवन, सामाजिक परिवर्तन आणि समकालीन प्रश्नांचे प्रतिबिंब उमटले. कवींच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दाद दिली. त्यामुळे चांदबिबी महालाचा परिसर कवितांच्या शब्दसुरांनी आणि टाळ्यांच्या कडकडाटाने भारून गेला.

कार्यक्रमास चित्रकार प्रा. रवींद्र सातपुते, नवजीवन प्रतिष्ठानचे राजेंद्र पवार, अथर्व थोरात, सत्यप्रेम गिरी, वॉरियर्स फाउंडेशनच्या संगीता गिरी, आरती गिरी,सागर पवार, प्रा. डॉ. तुकाराम गोंदकर, मकरंद घोडके यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी मान्यवर उपस्थित होते. काव्यसंमेलनात सहभागी झालेल्या कवींचा शाल, पुस्तक व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. जिल्ह्यातील विविध भागांतून कवी व साहित्यिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने ‘श्रावणधारा’ काव्यसंमेलनाला जिल्हास्तरीय साहित्यिक मेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र उदागे, प्रा.रवींद्र देवडे, राजेंद्र चोभे, शिवाजी साबळे, हर्षली व यज्ञाजा यांनी विशेष परिश्रम घेतले. निसर्गरम्य चांदबिबी महाल परिसरात झालेल्या या काव्यसंमेलनाने अहिल्यानगरच्या साहित्यिक वातावरणात नवचैतन्य निर्माण केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा