पुणे :
पुणे येथील सुप्रसिद्ध चपराक प्रकाशनतर्फे प्रकाशित आणि कवयित्री सायली गिरीश कुलकर्णी द्वारा लिखित ‘किमया घडली शब्दांची’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच पुणे येथील माधवराव पटवर्धन सभागृहात थाटात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय ज्योत्स्ना चांदगुडे, विशेष अतिथी म्हणून माननीय जयश्री काळवीट, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.श्रीपाद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
सायली कुलकर्णी लिखित कवितासंग्रहामध्ये मुक्तछंद, वृत्तबद्ध, अष्टाक्षरी, अभंग अशा विविध काव्यप्रकारांतील, नानाविध विषयांवरील सुंदर आशयघन कवितांचा समावेश असून वाचकांच्या मनाचा ठाव घेणारे असे हे लेखन आहे, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या सोहळ्याला अनेक साहित्यिक, वाचक आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय प्राजक्ता चिंचोळकर यांनी केले तर प्रकाशनानंतर संपन्न झालेल्या कवयित्रीसोबत गप्पा व कविता या कार्यक्रमाचे सुसंवादक कवी मकरंद शांताराम कुलकर्णी हे होते. सदर पुस्तक चपराक प्रकाशनच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध असून काव्यसंग्रहाचे मूल्य ₹ १५० आहे. साहित्यप्रेमींनी काव्यसंग्रहाला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन कवयित्री तर्फे करण्यात येत आहे.
