You are currently viewing मिठमुंबरी बीचवरील फिशिंग टूर्नामेंटमुळे देवगडचे नाव राज्याच्या पर्यटन नकाशावर झळकेल : पालकमंत्री नितेश राणे
Oplus_16908288

मिठमुंबरी बीचवरील फिशिंग टूर्नामेंटमुळे देवगडचे नाव राज्याच्या पर्यटन नकाशावर झळकेल : पालकमंत्री नितेश राणे

देवगड स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून तरुणांना क्रीडा क्षेत्रात मोठे व्यासपीठ उपलब्ध करून द्या : नितेश राणे

४.७४० किलोच्या वाघळी माशासाठी समीर लाड यांना प्रथम पारितोषिक

देवगड : देवगड तालुक्यातील मिठमुंबरी बीचवर देवगड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फिशिंग टूर्नामेंटमुळे देवगडचे नाव राज्याच्या पर्यटन नकाशावर पोहोचण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. पारंपरिक कार्यक्रमांच्या पलीकडे जाऊन अशा नाविन्यपूर्ण आणि साहसी क्रीडा स्पर्धांचे आयोजन सातत्याने झाले, तर देवगडमध्ये पर्यटक आणि क्रीडारसिकांचे आकर्षण वाढेल, असेही त्यांनी सांगितले.

देवगडमध्ये काहीतरी नवीन घडत असल्याचे पाहून आपल्याला सर्वाधिक आनंद होतो. देवगडमध्ये लोकांना येण्यासाठी, देवगडचे नाव घेण्यासाठी आणि देवगडचे नाव मोठे करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने झाले पाहिजेत, अशी अपेक्षा आपण पहिल्या दिवसापासून व्यक्त करत आलो आहोत. पर्यटनाच्या नकाशावर देवगडला आणायचे असेल, तर पारंपरिक कार्यक्रमांबरोबरच अशा वेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन होणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मिठमुंबरी बीचवर फिशिंग टूर्नामेंट होत आहे, ही चर्चा राज्यभर होणे देवगडच्या भविष्यासाठी निश्चितच फायदेशीर असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.

ललित चांदोस्कर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देवगड स्पोर्ट्स क्लबची स्थापना करून क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून तरुणाईला बळ देण्याचा, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आणि देवगडची ‘आरोग्यदायी तालुका’ अशी प्रतिमा निर्माण करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. पहिल्याच कार्यक्रमात ‘पहिल्याच बॉलवर सिक्सर’ मारल्याप्रमाणे देवगड स्पोर्ट्स क्लबने आपल्या कार्याची ताकद दाखवून दिली आहे, असे कौतुकही त्यांनी केले.

‘Say No to Drugs’चा संदेश देत तरुणांनी क्रीडा क्षेत्राकडे वळावे

देवगड आणि सिंधुदुर्गचे भविष्य सुरक्षित हातांमध्ये आहे, कारण येथील तरुण आजपासूनच ‘Say No to Drugs’सारख्या मोहिमांच्या माध्यमातून समाजाला चांगला संदेश देत आहेत. तरुणांनी ड्रग्जच्या मार्गावर जाण्याऐवजी आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारून स्वतःला स्पोर्ट्समन म्हणून घडवावे. देवगड पोलीस आणि प्रशासनासोबत समाजानेही या प्रयत्नांना बळ दिले, तर देवगड आणि सिंधुदुर्गचा विकास कोणीही थांबवू शकणार नाही, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.

देवगड स्पोर्ट्स क्लबने पहिल्याच कार्यक्रमात मोठा पल्ला गाठला असून, आता यापेक्षाही मोठे आणि दर्जेदार कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन नितेश राणे यांनी केले. अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स, वॉटर स्पोर्ट्स तसेच मच्छीमार समाज आणि स्थानिक तरुणांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या विविध स्पर्धा देवगडमध्ये आयोजित कराव्यात. देवगडच्या तरुणांनी एकत्र येऊन देवगडचे नाव जगाच्या पाठीवर पोहोचवावे. यासाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी राहू, असा विश्वास त्यांनी दिला.

स्पर्धेसाठी विविध राज्यांतून आलेल्या एँग्लर्सचे स्वागत करून नितेश राणे यांनी सर्व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन केले. या स्पर्धेच्या माध्यमातून देवगड स्पोर्ट्स क्लबने जिल्ह्यात आणि राज्यात चांगला संदेश दिला असून, पत्रकारांच्या माध्यमातून ही बातमी राज्यभर पोहोचल्यावर देवगडने केलेल्या या अभिनव उपक्रमाचा निश्चितच अभिमान वाटेल, असे त्यांनी सांगितले.

स्पर्धेतील पहिली पकड ललित परब (अनुक्रमांक २१) यांनी सकाळी ८.२६ वाजता केली, तर शेवटची पकड तोडणकर (अनुक्रमांक २९) यांनी दुपारी १.५५ वाजता केली. सर्वाधिक चार पकडी करण्याचा विक्रम अनंत सावंत (अनुक्रमांक २) यांनी केला.

फिशिंग टूर्नामेंटमध्ये ४.७४० किलो वजनाच्या वाघळी माशासाठी समीर लाड यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. ३.३०० किलो वजनाच्या वाघळी माशासाठी मंदार रेगे यांनी द्वितीय क्रमांक, तर २.३८० किलो वजनाच्या वाघळी माशासाठी नयन सुतार यांनी तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बोडस, अर्बन बँक देवगडचे अध्यक्ष प्रकाश राणे, बाळा खडपे, दयानंद पाटील, वैभव करंगुटकर, योगेश चांदोसकर देवगड जामसंडे नगरपंचायत सभापती तन्वी चांदोस्कर बुवा तारी, कुणकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ तेली, कुणकेश्वरचे सरपंच महेश ताम्हणकर, मिठमुंबरीचे सरपंच बाळकृष्ण गावकर, देवगड स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष ललित चांदोरकर, किरण पाटील, सोहम पारकर आणि चिन्मय खानविलकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी केले.

स्पर्धेतील पकडलेले मासे ‘कॅच अँड रिलीज’ पद्धतीने पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. समुद्री जीवसृष्टीचे संवर्धन आणि पर्यावरणाचे भान राखत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा