You are currently viewing हातावर राखी, सुरक्षेची हमी! सावंतवाडी पोलिसांचा अनोखा उपक्रम

हातावर राखी, सुरक्षेची हमी! सावंतवाडी पोलिसांचा अनोखा उपक्रम

हेल्मेट व सीटबेल्ट वापरण्याचे आवाहन; वाहनचालकांना लाडू देत वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून दिले

सावंतवाडी / प्रतिनिधी :

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त अनोखा जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. “बंधन हेल्मेटचे, रक्षण जीवांचे; बंधन सीटबेल्टचे, रक्षण जीवांचे” असा संदेश देत वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

सावंतवाडी शहरातील गांधी चौक येथे हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांच्या तसेच सीटबेल्ट न लावलेल्या चारचाकी वाहनचालकांच्या हातात पोलिसांकडून राखी बांधण्यात आली. तसेच रक्षाबंधनानिमित्त वाहनचालकांना लाडू देऊन वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देण्यात आले.

यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी वाहनचालकांना सुरक्षित प्रवासाबाबत मार्गदर्शन केले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या कुटुंबीयांची वाट पाहणारे कुणीतरी घरी आहे, याची जाणीव ठेवून प्रत्येकाने आपल्या जीवाची काळजी घ्यावी, वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन करण्यात आले.

“दुचाकी चालविताना हेल्मेट आणि चारचाकी चालविताना सीटबेल्टचा वापर करणे ही केवळ पोलिसांची भीती म्हणून नव्हे, तर स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आवश्यक बाब आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास यापुढे कारवाई करण्यात येईल,” असा इशाराही पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिला.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने वाहनचालकांच्या हातावर राखी बांधून “तुमच्या जीवाचे रक्षण करा आणि सुरक्षित घरी परत या” असा भावनिक संदेश पोलिसांनी दिला. या उपक्रमाला वाहनचालक व नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमास पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम, माधुरी मुळीक, निलेश परब, आबा पिळणकर, अमित राऊळ, निलेश नाईक, मयूर सावंत, पोलिस पाटील संदेश राऊळ, तसेच रिक्षा संघटना अध्यक्ष धर्मेंद्र सावंत आणि सामाजिक कार्यकर्त्या रवी जाधव आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा