दृष्टीहीनांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी नेत्रदानाचे आवाहन
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जागतिक नेत्रदान पंधरवड्याचे उद्घाटन
सिंधुदुर्गनगरी
राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी दि. 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत जागतिक नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे दि. 27 ऑगस्ट 2026 रोजी जागतिक नेत्रदान पंधरवड्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला या कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिल्पा नारायणकर, नेत्रशल्यचिकित्सा विभागाचे विभागप्रमुख डॉ. धनंजय भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मोतीफळे यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितांना नेत्रदानाचे महत्त्व, नेत्रदानाची प्रक्रिया तसेच नेत्रदानामुळे दृष्टीहीन व्यक्तींच्या जीवनात येणारा सकारात्मक बदल याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. नेत्रदान हे दृष्टीहीनांच्या जीवनात प्रकाश आणण्यासारखे असून, आपल्या पश्चात आपल्या डोळ्यांमुळे एखाद्या व्यक्तीला जग पाहण्याची संधी मिळू शकते. नेत्रदानामुळे दृष्टी गमावलेल्या व्यक्तींना नव्या आयुष्याची आणि उज्ज्वल भविष्याची आशा मिळते. त्यामुळे नागरिकांनी नेत्रदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
