You are currently viewing गणेश चतुर्थीपूर्वी बोर्डवे-बौद्धवाडी ते वाणीवाडी रस्त्याची डागडुजी करा

गणेश चतुर्थीपूर्वी बोर्डवे-बौद्धवाडी ते वाणीवाडी रस्त्याची डागडुजी करा

गणेश चतुर्थीपूर्वी बोर्डवे-बौद्धवाडी ते वाणीवाडी रस्त्याची डागडुजी करा

ग्रामस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व बांधकाम विभागाकडे निवेदन; मागणी पूर्ण न झाल्यास उपोषणाचा इशारा

कणकवली :

बोर्डवे गावातील बौद्धवाडी ते वाणीवाडी हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी या रस्त्याची तात्पुरत्या स्वरूपात कच्ची डागडुजी करून वाहतुकीस योग्य करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.
याबाबत ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य कार्यकारी अभियंता (बांधकाम विभाग) तसेच कणकवली गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री. महादेव राठवड, कळसुली विभाग प्रमुख श्री. बबली राणे, ग्रामस्थ निलेश परब यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
गणेश चतुर्थीपूर्वी या रस्त्याची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करून देण्यात येईल, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिले. मात्र, दिलेल्या मुदतीत रस्त्याची डागडुजी झाली नाही, तर ग्रामस्थ व चाकरमानी यांच्या वतीने उपोषण व आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गणेशोत्सव काळात या मार्गावरून नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनातून स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा