You are currently viewing कवीने कवितेसोबतच माणूसपण जपावे! – प्रा. विजय लोंढे

कवीने कवितेसोबतच माणूसपण जपावे! – प्रा. विजय लोंढे

कवीने कवितेसोबतच माणूसपण जपावे! – प्रा. विजय लोंढे

पुणे

*३३ व्या नवयुग श्रावणी काव्यस्पर्धेत अनिल भोईर प्रथम*
पिंपरी (दिनांक : २७ ऑगस्ट २०२६) नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आणि स्वर्गवासी दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३३ व्या नवयुग श्रावणी काव्यस्पर्धेत अनिल भोईर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अरविंद – वृंदा सभागृह, दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे बुधवार, दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. विजय लोंढे उर्फ हरिसुत यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा संपन्न झाली. याप्रसंगी नवयुगचे अध्यक्ष राज अहेरराव, कार्याध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र घावटे, सचिव माधुरी ओक, संचालक अनिकेत गुहे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. काव्यलेखन स्पर्धेत सहभागी झालेल्या सुमारे ९२ कवींपैकी ७० कवींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कवितेचे सादरीकरण केले. स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या कवींचा तपशील खालीलप्रमाणे :-
अनिल भोईर (प्रथम), सुभाष धाराशिवकर (द्वितीय), दत्ता सुकाळे (तृतीय), उमा इनामदार, वैशाली भांडारकर आणि श्रीकांत जगताप (उत्तेजनार्थ)

विनाशुल्क असणाऱ्या या स्पर्धेत, विजेत्या कवींना सन्मानचिन्ह, रोख रक्कम, प्रशस्तिपत्र, ग्रंथ, लेखणी आणि शाल प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर सहभागी सर्व कवींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. कवयित्री वंदना इन्नाणी आणि काव्यरसिक संपत शिंदे यांनी परीक्षण केले.

यावेळी स्पर्धेतील कवींना मार्गदर्शन करताना प्रा. विजय लोंढे उर्फ हरिसुत म्हणाले की, ‘कवितेत नकारात्मकता नसावी तर शब्दवैभव नांदावे. प्रसाद, माधुर्य, ओज या गुणांनी कविता समृद्ध असावी. आपली संत आणि पंत काव्यपरंपरा अभ्यासली की आपली कविता ही स्वरूपातून विश्वरूपाकडे झेपावते. लौकिकार्थाने कवी कितीही मोठा झाला तरी त्याने कवितेसोबतच माणूसपण जपावे!’ नवयुगचे अध्यक्ष राज अहेरराव यांनी आपल्या मनोगतातून, ‘एखाद्या विशाल कुटुंबासारखे असलेले नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ हे गेल्या ३३ वर्षांपासून कवितेचा प्रचार अन् प्रसार हे उद्दिष्ट समोर ठेवून श्रावणी काव्यस्पर्धेचे प्रतिवर्षी निष्ठेने आयोजन करीत आहे. आजचे कवी हे संतकवींचे वारसदार आहेत. ज्याप्रमाणे अतिशय प्रेमाने आपण आपल्या अपत्याची जोपासना करतो, त्याप्रमाणेच कवींनी आपली कविता जोपासावी. स्पर्धेची कविता ही मुखोद्गत असावी. मोबाइल आणि कागदामुळे सादरीकरणात अडथळा येत असतो!’ असे आवाहन केले. राजेंद्र घावटे यांनी प्रास्ताविकातून नवयुग मंडळाच्या ३३ वर्षांच्या कालावधीतील विविध साहित्यविषयक उपक्रमांची माहिती दिली. रजनी अहेरराव, माधुरी विधाटे, नेहा कुलकर्णी, नंदकुमार मुरडे, शरद काणेकर, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. अरविंद वाडकर यांनी काव्यस्पर्धेचे सूत्रसंचालन केले. पी. बी. शिंदे यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा