You are currently viewing सिंधुदुर्गातील शासकीय रुग्णालयांमध्ये उल्लेखनीय वैद्यकीय कामगिरी

सिंधुदुर्गातील शासकीय रुग्णालयांमध्ये उल्लेखनीय वैद्यकीय कामगिरी

सिंधुदुर्गातील शासकीय रुग्णालयांमध्ये उल्लेखनीय वैद्यकीय कामगिरी; तज्ज्ञ डॉक्टरांच्या कार्याचे जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानकडून कौतुक

गेल्या तीन महिन्यांत शस्त्रक्रिया व वैद्यकीय प्रक्रियांमध्ये उल्लेखनीय कामगिरी; डॉ. गिरीश चौगुले यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांचे अभिनंदन

सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये गेल्या तीन महिन्यांत विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया व वैद्यकीय प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडत रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचे जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहेत.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील जनरल सर्जन डॉ. गिरीश चौगुले यांनी एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांत जनरल सर्जरीच्या एकूण १५५ शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष कौतुक करण्यात आले. तसेच स्त्रीरोग विभागातील डॉ. भक्ती सावंत यांच्यासह जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये सेवा देणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ व अन्य डॉक्टरांनीही मोठ्या प्रमाणात रुग्णसेवा केली आहे.
विविध विभागांतील डॉक्टरांची उल्लेखनीय कामगिरी
जिल्ह्यातील नेत्रतज्ज्ञ विभागात डॉ. बाळसाहेब जोशी, डॉ. नेहा पावसकर आणि डॉ. धनंजय भोसले यांनी नेत्रसेवा व शस्त्रक्रियांमध्ये योगदान दिले. स्त्रीरोग विभागात डॉ. मीनल नागवेकर, डॉ. गायत्री पालेकर, डॉ. प्रियांका म्हसकर, डॉ. भक्ती सावंत, डॉ. संजय विळकर, डॉ. भावना तेलंग, डॉ. प्रितम जगताप, डॉ. गायत्री शर्मा आणि डॉ. प्रियांका कासार यांच्यासह इतर तज्ज्ञांनी रुग्णांना सेवा दिली.
कान-नाक-घसा विभागात डॉ. एस. व्ही. राणे यांनी शस्त्रक्रिया केल्या. जनरल सर्जरी विभागात डॉ. निखिल जाधव, डॉ. अनिलजीत वज्राठकर, डॉ. महेंद्र आचरेकर आणि डॉ. गिरीश चौगुले यांनी विविध शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या.
दंतवैद्यक विभागातही डॉ. समीर धाकोरकर, डॉ. हुमायूं माने आणि डॉ. संजय दिगंबर चाटे यांनी मोठ्या प्रमाणात दंत उपचार व वैद्यकीय प्रक्रिया केल्या आहेत.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या योगदानाचेही कौतुक
डॉक्टरांसोबतच ऑपरेशन थिएटरमध्ये कार्यरत असलेले आरोग्य कर्मचारी, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनीही गोरगरीब व गरजू रुग्णांना उत्तम सेवा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या सर्वांच्या निष्ठेचे, शस्त्रक्रियेतील कौशल्याचे आणि रुग्णसेवेप्रती असलेल्या बांधिलकीचे राजू मसुरकर यांनी विशेष कौतुक केले.
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय तसेच जिल्ह्यातील विविध तालुका रुग्णालयांमध्ये कार्यरत डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवेमुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या जिल्ह्यातच विविध प्रकारच्या वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध होत आहेत, ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्कृष्ट आरोग्यसेवेसाठी पुरस्कार देण्याची मागणी
शासकीय आरोग्यसेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा शासनाच्या आरोग्य विभागामार्फत तसेच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ‘आरोग्य सेवा पुरस्कार’ देऊन यथोचित सन्मान करण्यात यावा, अशी मागणीही राजू मसुरकर यांनी केली.
“गोरगरीब रुग्णांची सेवा हीच ईश्वरी सेवा आहे. डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी यापुढेही अशीच निष्ठेने सेवा बजावावी. त्यांच्या उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्य, सुख-समाधान आणि यश लाभावे,” अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेत कार्यरत सर्व तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा