सहकार क्षेत्रातील व्यवसायिकांबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन; विविध विभागांची केली पाहणी
कुडाळ : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी कुडाळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान संघाचे उपाध्यक्ष अरविंद शिरसाट व संचालक निलेश तेंडुलकर यांनी त्यांचे शाल, पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची प्रतिमा देऊन स्वागत व सत्कार केला.
यावेळी सतीश मराठे यांनी संघाच्या साधना बाजार, गॅस विभाग, साधना बाजार पॅकिंग विभाग आणि खत गोदामाची पाहणी केली व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. चेअरमन, उपाध्यक्ष अरविंद शिरसाट व निलेश तेंडुलकर यांनी घरगुती गॅस वितरण प्रणालीतील बदल तसेच ग्रामीण भागातील नेटवर्क समस्येमुळे वितरणात येणाऱ्या अडचणींबाबत विचार मांडून निवेदन दिले. तसेच सध्याच्या बाजारभावातील चढ-उतारांवरही चर्चा करण्यात आली. सतीश मराठे यांनी उपाध्यक्ष व संचालकांना सहकार क्षेत्रातील व्यावसायिकांबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार भारती शाखेच्या स्थापनेत सतीश मराठे यांचे बहुमोल योगदान आहे. ते २०१८ पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यकारी मंडळावर संचालक असून ऑगस्ट २०२४ पासून को-ऑपरेटिव्ह बँकिंग अँड फायनान्स कमिटीचे प्रमुख सदस्य म्हणून काम पाहत आहेत. तसेच ऑगस्ट २०२४ पासून ते नाबार्ड या संस्थेवर संचालक म्हणून कार्यरत आहेत.
सरकार आणि सहकारी संस्था यामधील दुवा म्हणून सहकार भारतीच्या माध्यमातून त्यांची संपूर्ण भारतात महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
