यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थिनींची युवा महोत्सवात दमदार कामगिरी
क्रिएटिव्ह डान्स प्रकारात उपविजेतेपद; मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीत प्रवेश
सावंतवाडी : प्रतिनिधी
नृत्यकलेला सर्जनशीलतेची जोड, भन्नाट संकल्पना आणि दमदार सांघिक सादरीकरणाच्या जोरावर सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (वायबीआयटी) विद्यार्थिनींनी मुंबई विद्यापीठाच्या ५९व्या आंतरमहाविद्यालयीन विभागीय युवा महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. क्रिएटिव्ह डान्स प्रकारात वायबीआयटीच्या संघाने उपविजेतेपद पटकावत थेट विद्यापीठस्तरीय अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे २१ ऑगस्ट रोजी कलिना, मुंबई येथील कवी कुसुमाग्रज मराठी भाषा आणि साहित्य भवन येथे विभागीय फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वायबीआयटीच्या विद्यार्थिनींनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून परीक्षकांची दाद मिळवली. सर्जनशील संकल्पना, प्रभावी भावमुद्रा, उत्स्फूर्त सादरीकरण आणि अचूक सांघिक समन्वय यामुळे वायबीआयटीच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.
या सादरीकरणासाठी निधी शिरोडकर हिने विशेष मेहनत घेत संघाच्या तयारीत महत्त्वाची भूमिका बजावली. यशस्वी संघात निधी शिरोडकर (तृतीय वर्ष, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग), अनुष्का पंडित (द्वितीय वर्ष, मेकॅनिकल इंजिनिअरिंग), अदिती परब (द्वितीय वर्ष, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग), तसेच वेदिका माडखोलकर, चिन्मयी गोवेकर, उज्वला रेडकर, धन्वी मांजरेकर, आर्या कदम, लावण्या पिंगुळकर आणि योजना पवार (सर्व द्वितीय वर्ष, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग) यांचा समावेश आहे.
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाच्या प्रा. अदिती शेंडेकर यांनी मुंबई येथे संघासोबत उपस्थित राहून विद्यार्थिनींना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संघाला स्पर्धेच्या तयारीत मोठी मदत झाली.
विभागीय फेरीतील या दमदार कामगिरीनंतर वायबीआयटीचा संघ मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीत सहभागी होणार आहे. ही अंतिम फेरी ४ ऑक्टोबर रोजी होणार असून, या फेरीतही संघाकडून उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या शानदार यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य डॉ. रमण बाणे, प्राध्यापकवर्ग आणि संस्थेतील सर्व घटकांनी विजयी संघाचे अभिनंदन करून अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.
