माळेवाडी-शिरोडा मार्गावरील झाडी हटवून पथदिवे सुरू करण्याची मागणी
अपघातांना निमंत्रण; ‘झोपलेले प्रशासन कधी जागे होणार?’ — प्रथमेश उर्फ बंड्या परब
वेंगुर्ला
माळेवाडी ते शिरोडा या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. झाडीमुळे रस्त्यावरील दृश्यमानता कमी होत असून, यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच संपूर्ण मार्गावर पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी हा मार्ग अधिक धोकादायक ठरत आहे.
गोवा येथून अनेक तरुण रात्रीच्या वेळी माळेवाडी-शिरोडा मार्गाने आपल्या घरी ये-जा करतात. मात्र, रस्त्यावर अंधार आणि दुतर्फा वाढलेली झाडी यामुळे त्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेणे तसेच रस्त्याच्या कडेला असलेले अडथळे ओळखणे कठीण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वेंगुर्ला युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रथमेश उर्फ बड्या परब यांनी केला आहे. “झोपलेले प्रशासन कधी जागे होणार?” असा सवाल करत माळेवाडी ते शिरोडा मार्गावरील वाढलेली झाडी तातडीने हटवावी, तसेच संपूर्ण मार्गावर आवश्यक ठिकाणी पथदिव्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी प्रसारमाध्यमांद्वारे केली आहे.
रस्त्याची सुरक्षितता लक्षात घेता संबंधित प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी मागणीही प्रथमेश परब यांनी केली आहे.
