वेंगुर्ला होणार ‘बॅनरमुक्त’; शुभेच्छांसाठी पाच ठिकाणी डिजिटल एलईडी स्क्रीन
नगरपरिषदेचा सर्वानुमते निर्णय; दाभोली नाका, मार्केटसह पाच प्रमुख ठिकाणी स्क्रीनची सुविधा
वेंगुर्ले
वेंगुर्ला शहराचे सौंदर्य, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने वेंगुर्ला नगरपरिषदेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गणेश चतुर्थी नियोजनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्य, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष तसेच विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत ‘बॅनरमुक्त वेंगुर्ला’ करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. बॅनरला पर्याय म्हणून शहरातील पाच प्रमुख ठिकाणी डिजिटल एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, सभापती गौरी मराठे, सचिन शेटे, नगरसेवक सदानंद गिरप आदी उपस्थित होते.
वेंगुर्ला शहरात सण, उत्सव, वाढदिवस, शुभेच्छा संदेश तसेच विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात बॅनर लावले जातात. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होण्याबरोबरच वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन गणेश चतुर्थीसह यापुढे कोणत्याही कालावधीत शहरात बॅनर लावण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाच प्रमुख ठिकाणी एलईडी स्क्रीन
बॅनरला पर्याय म्हणून नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील दाभोली नाका, वेंगुर्ला मार्केट, हॉस्पिटल नाका, पॉवर हाऊस आणि पिराची दर्गा या पाच प्रमुख ठिकाणी डिजिटल एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार आहेत.
या स्क्रीनवर नागरिकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा, सण-उत्सवांच्या शुभेच्छा तसेच विविध कार्यक्रम आणि संदेश प्रसिद्ध करता येणार आहेत. संबंधित नागरिकांनी आपला संदेश नगरपरिषदेकडे द्यायचा असून, मागणीनुसार एक-दोन दिवस, चार दिवस, आठ दिवस किंवा पंधरा दिवस अशा कालावधीसाठी संदेश प्रदर्शित करता येणार आहे.
बॅनरच्या खर्चाच्या आसपासच शुल्क
डिजिटल प्रसिद्धीसाठी आकारण्यात येणारे शुल्क अत्यंत वाजवी ठेवण्यात येणार आहे. पारंपरिक बॅनर तयार करण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या आसपासच हे शुल्क ठेवण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न राहणार आहे. या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळविणे हा नगरपरिषदेचा उद्देश नसून, वेंगुर्ला शहर बॅनरमुक्त करणे हाच मुख्य उद्देश असल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी स्पष्ट केले.
सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन
‘बॅनरमुक्त वेंगुर्ला’ हा निर्णय यशस्वी करण्यासाठी नागरिक, व्यापारी, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि विविध मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष गिरप यांनी केले. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयामुळे आगामी सणासुदीच्या काळात शहराचे सौंदर्य अधिक खुलून दिसण्यास मदत होणार आहे.
वेंगुर्ला शहराला बॅनरच्या गर्दीतून मुक्त करून डिजिटल माध्यमातून शुभेच्छा व संदेश देण्याची सुविधा सुरू झाल्यानंतर असा निर्णय घेणारी वेंगुर्ला नगरपरिषद पहिली नगरपरिषद ठरणार असल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितले.
