You are currently viewing पप्या तवटे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महामार्ग प्रशासनाला जाग; पावशी-घावनळेफाटा येथे धोकादायक लेनवर उपाययोजना सुरू

पप्या तवटे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महामार्ग प्रशासनाला जाग; पावशी-घावनळेफाटा येथे धोकादायक लेनवर उपाययोजना सुरू

पप्या तवटे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महामार्ग प्रशासनाला जाग; पावशी-घावनळेफाटा येथे धोकादायक लेनवर उपाययोजना सुरू

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर तात्पुरत्या कामाला सुरुवात; कायमस्वरूपी दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी

कुडाळ
पावशीचे माजी सरपंच श्रीपाद उर्फ पप्या तवटे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला जाग आली असून पावशी-घावनळेफाटा येथील बॉक्सेलजवळ मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातप्रवण लेनवर आजपासून तात्पुरत्या स्वरूपातील उपाययोजनांचे काम हाती घेण्यात आले आहे.
या ठिकाणी पावसाळ्यात महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने तसेच रस्त्याच्या तांत्रिक दोषांमुळे वाहनांचे नियंत्रण सुटून वारंवार अपघात घडत आहेत. गेल्या तीन वर्षांत या ठिकाणी ४० हून अधिक अपघात झाल्याची नोंद असून, याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नव्हती.
यामुळे माजी सरपंच श्रीपाद (पप्या) तवटे यांनी महामार्गाची तांत्रिक पाहणी करून अपघातांची कारणे शोधून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. तसेच आठ दिवसांच्या आत प्रशासनाने योग्य कार्यवाही न केल्यास महामार्गावर जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
यासोबतच पप्या तवटे यांनी या धोकादायक लेनबाबत पालकमंत्री नितेश राणे यांचेही लक्ष वेधून आवश्यक निर्देश देण्याची विनंती केली होती. त्यानंतर पालकमंत्र्यांनी महामार्ग प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आजपासून जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याची लेन रफ करण्यासह आवश्यक तात्पुरत्या उपाययोजनांचे काम सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, पप्या तवटे यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी करून ही केवळ तात्पुरती नव्हे, तर कायमस्वरूपी उपाययोजना करून संबंधित लेन वाहतुकीस सुरक्षित करण्यात यावी, अशी मागणी पुन्हा केली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर कामाला सुरुवात झाल्याने वाहनधारक आणि ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा