You are currently viewing मातीच्या घरांचा तातडीने सर्व्हे करून घरकुल मंजूर करा

मातीच्या घरांचा तातडीने सर्व्हे करून घरकुल मंजूर करा

मातीच्या घरांचा तातडीने सर्व्हे करून घरकुल मंजूर करा

वालावल पंचायत समिती मतदारसंघातील नेरुर, वालावल, चेंदवण, कवठी ग्रामपंचायतीतील लाभार्थ्यांचा प्रश्न; अर्चना बंगे यांची सीईओंकडे मागणी

कुडाळ

वालावल पंचायत समिती मतदारसंघातील नेरुर, वालावल, चेंदवण व कवठी ग्रामपंचायत हद्दीत आजही अनेक कुटुंबे मातीच्या घरांमध्ये राहत आहेत. ही घरे जीर्ण झाली असून काही घरे कोसळण्याच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे या घरांचा तातडीने सर्व्हे करून पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मंजूर करावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना बंगे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्याकडे केली आहे.
सौ. बंगे यांनी सांगितले की, वालावल पंचायत समिती मतदारसंघात आजही अनेक कुटुंबांची मातीची घरे आहेत. पावसाळ्यात या घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. काही घरे तर अगदी कोसळण्याच्या स्थितीत असून, अशा घरांचा प्राधान्याने सर्व्हे होणे आवश्यक आहे.
दररोज सकाळी आपल्या पोटापाण्यासाठी कामानिमित्त घराबाहेर पडणारे आणि संध्याकाळी घरी परतणारे अनेक गरजू लाभार्थी शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळवू शकत नाहीत. त्यामुळे अशा पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने विशेष बाब म्हणून तातडीने सर्व्हे करावा, अशी मागणी अर्चना बंगे यांनी केली आहे.
मातीच्या घरात राहणाऱ्या खऱ्या गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेत समाविष्ट करून त्यांना सुरक्षित निवारा मिळवून द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा