सांगली / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) : जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबवण्यात येत असलेल्या आणि नियोजन विभाग अंतर्गत असलेल्या ‘महास्ट्राईड’ (MahaSTRIDE) उपक्रमांतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षात सांगली जिल्ह्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा धोरणात्मक योजनांच्या अंमलबजावणीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. जिल्हा धोरणात्मक आराखड्याच्या यशस्वी अंमलबजावणी केल्याने कामगिरी-आधारित प्रोत्साहनपर अनुदानासाठी (Performance-Based Incentive) पात्र ठरल्याने सांगली जिल्ह्याला १६ कोटी रुपयांचे विशेष प्रोत्साहनपर अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा पत्राद्वारे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष व यंत्रणांचे अभिनंदन करून अशीच भरीव कामगिरी सुरू ठेवावी, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
या उपक्रमांतर्गत पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश झाला असून जिल्ह्याने 82 टक्के गुणांकन मिळवले आहे. या गुणांसह सांगलीने संपूर्ण राज्यात चौथा तर पुणे विभागात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
दरम्यान या यशाबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील आणि सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी उदय पवार यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
वार्षिक धोरणात्मक कृती आराखड्याच्या (ASAP) अंमलबजावणीसाठी सांगली जिल्ह्याने तब्बल 61 कोटी रुपयांचे खाजगी भांडवल (Private Capital) उभारण्यात यश मिळवले आहे. जिल्ह्याच्या या प्रयत्नांमुळे राज्याच्या ‘विकसित महाराष्ट्र’ संकल्पनेला बळ मिळाले असून, सांगलीला गुंतवणुकीचे एक प्रमुख केंद्र म्हणून विकसित होण्यास मोठी मदत होणार आहे. मंजूर करण्यात आलेल्या 16 कोटी रुपयांच्या अनुदानाच्या वापराबाबतची सविस्तर नियमावली ‘मित्रा’ (MITRA) संस्थेकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे.
