You are currently viewing गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांची दुरुस्ती; दोन दिवस वाहतूक बंद

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांची दुरुस्ती; दोन दिवस वाहतूक बंद

नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत भोंसले यांनी केली पाहणी

सावंतवाडी :

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठेत नागरिक आणि व्यापाऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन नगरपालिकेने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम वेगाने सुरू असून, या कामासाठी मुख्य बाजारपेठेतील वाहतूक दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

गणेशोत्सवादरम्यान शहरात येणाऱ्या गणेशभक्तांना, स्थानिक नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत भोंसले यांनी नियोजन सभापती आनंद नेवगी, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, सुकन्या टोपले आणि नीलम नाईक यांच्यासह प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.

नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत भोंसले यांनी कामावर विशेष लक्ष ठेवत उपस्थित अधिकारी आणि कंत्राटदाराला रस्त्याच्या कामाचा दर्जा उत्तम राखण्याच्या सूचना दिल्या. गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात नागरिक तसेच बाहेरून येणाऱ्या गणेशभक्तांची वर्दळ असते. त्यामुळे खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी किंवा अपघात होऊ नयेत, यासाठी हे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहे.

रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना दोन दिवस नागरिक व व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा यांनी केले आहे. तसेच वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रस्त्याचे काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा