You are currently viewing उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय, ग्रंथमित्र पुरस्कारासाठी 25 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय, ग्रंथमित्र पुरस्कारासाठी 25 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

सांगली / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयामार्फत सन 2025-26 या वर्षासाठी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार” तसेच “डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार” यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. इच्छुक ग्रंथालये, ग्रंथालय कार्यकर्ते व ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) यांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत तीन प्रतींमध्ये संबंधित जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालयाचे प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, नागरिकांना अधिक दर्जेदार ग्रंथालयीन सेवा उपलब्ध व्हाव्यात तसेच वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसेच ग्रंथालय चळवळीतील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कार्यकर्ते व सेवकांचा गौरव करण्यासाठी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार देण्यात येतो.

या पुरस्कारांतर्गत राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील “अ”, “ब”, “क” आणि “ड” वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये 1 लाख, 75 हजार, 50 हजार आणि 25 हजार रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येणार आहे.

तसेच राज्यस्तरावर एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि एक उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रुपये 50 हजार रोख रक्कम देण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील प्रत्येक महसुली विभागातून प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांची निवड करून त्यांना प्रत्येकी रुपये 25 हजार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट प्रदान करण्यात येणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा