‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ साठी १३०० जणांची नोंदणी,
जास्तीत जास्त नागकरिकांनी सहभाग घ्यावा – अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे
पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते होणार शुभारंभ, अनेक मान्यवरांची उपस्थिती
पहिल्या तीन विजेत्यांना २५, १५ आणि १० हजार रूपयांचे बक्षीस,
यासह ७ जणांना मिळणार विशेष बक्षीस
सिंधुदुर्गनगरी
‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ हा मृद व जलसंधारणाचा संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी जलसंधारण दिनानिमित्त २१ ऑगस्ट २०२६ रोजी सिंधुदुर्गनगरी येथे ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. आत्तापर्यंत १३०० जणांनी नोंदणी केली असून मृद व जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने आयोजित या वॉकेथॉनमध्ये जिल्ह्यातील नागरिक, युवक, विद्यार्थी, महिला, शासकीय अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, कार्यकारी अभियंता मृद व जलसंधारण संतोष शिरोडकर, जिल्हा क्रिडा अधिकारी मार्क जेकब धरमाई, सिंधुदुर्ग जिल्हा हौसी ॲथलॅटिक संघटनेच्या कल्पना तेंडुलकर, बाळकृष्ण कदम उपस्थित होते.
मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने आयोजित या उपक्रमाचा शुभारंभ २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड ग्राऊंड येथे होणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते वॉकेथॉनचा शुभारंभ होणार आहे. यावेळी खासदार नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, अनिकेत तटकरे, प्रमोद जठार, दीपक केसरकर, निलेश राणे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
वॉकेथॉनची सुरुवात पोलीस परेड ग्राऊंड येथून होऊन डॉन बॉस्को सर्कल, जिल्हा परिषद मुख्य प्रवेशद्वार, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी नर्सिंग कॉलेज मार्गे पुन्हा पोलीस परेड ग्राऊंड येथे सांगता होणार आहे. या वॉकेथॉनमध्ये कमाल ३ किलोमीटर अंतराचे चालणे तसेच मृद व जलसंधारणाची शपथ घेण्यात येणार आहे. १५ वर्षे व त्यावरील महिला व पुरुषांना या उपक्रमात सहभागी होता येणार असून, सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र, टीशर्ट देण्यात येणार आहे.
वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी https://register.mahaevent.co.in/#/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी. विशेष म्हणजे या स्पर्धेत प्रथम तीन विजेत्यांनी अनुक्रमे २५ हजार, १५ हजार व १० हजार अशी बक्षिस स्वरुपात रोख रक्कम दिली जाणार आहे. यासह सात स्पर्धकांची निवड ईश्वर चिठ्ठीद्वारे करुन त्यांना प्रति स्पर्धक ३ हजार बक्षिस दिले जाणार आहे.
