You are currently viewing ‘टीबीमुक्त सिंधुदुर्ग’चा नितेश राणेंचा निर्धार

‘टीबीमुक्त सिंधुदुर्ग’चा नितेश राणेंचा निर्धार

१२५ क्षयरुग्णांचे पालकत्व; पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली

निक्षय पोषण आहार किटचे वितरण; खाजगी डॉक्टरांचाही गौरव

सिंधुदुर्ग / प्रतिनिधी :

‘टीबी मुक्त भारत अभियान’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला बळ देत सिंधुदुर्ग जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याच्या दिशेने पालकमंत्री नितेश राणे यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील १२५ गरजू उपचारित क्षयरुग्णांना दत्तक घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी सहा महिन्यांसाठी त्यांना मोफत पोषण आहार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना एकाचवेळी निक्षय पोषण आहार उपलब्ध करून देणारा हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरणारा आहे.

क्षयरोगावरील उपचारांमध्ये औषधांसोबत सकस व प्रथिनयुक्त आहार अत्यंत महत्त्वाचा असतो. आर्थिक अडचणींमुळे अनेक रुग्णांना आवश्यक पोषण मिळत नसल्याने त्यांच्या उपचार प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून नितेश राणे यांनी १२५ क्षयरुग्णांच्या पोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. या उपक्रमामुळे रुग्णांच्या आरोग्य पुनर्वसनाला मोठी मदत होणार आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वितरण करण्यात आले. ‘टीबी मुक्त सिंधुदुर्ग’चा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी शासन, आरोग्य यंत्रणा, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आणि समाज यांच्या संयुक्त प्रयत्नांना या उपक्रमामुळे अधिक बळ मिळणार आहे.

या कार्यक्रमास आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

‘टीबी मुक्त भारत’ अभियानात योगदान देणाऱ्या डॉक्टरांचा गौरव

‘टीबी मुक्त भारत अभियान’ यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. संजय केसरे, डॉ. राजेंद्र पाताडे, डॉ. प्रशांत कोलते, डॉ. जी. टी. राणे, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. मिलिंद नार्वेकर तसेच केमिस्ट असोसिएशनच्या प्रतिनिधींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

क्षयरुग्णांचा शोध, उपचार, समुपदेशन तसेच उपचारांचा सातत्याने पाठपुरावा करण्यामध्ये या वैद्यकीय व्यावसायिकांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना एकाच वेळी निक्षय पोषण आहार उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमामुळे ‘टीबीमुक्त सिंधुदुर्ग’च्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी हा उपक्रम राज्यासाठीही आदर्श ठरेल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा