*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*
*अभिमान जेव्हा गर्वात बदलतो*
अभिमान आणि गर्व हे दोन शब्द वरवर पाहता समानार्थी आहेत असे वाटते परंतु या दोन शब्दात फार मोठा फरक आहे.
अभिमान ही सकारात्मक संज्ञा आहे, आपल्या मुलांचे, नातवंडांचे, मातृभूमीसाठी लढणाऱ्या सैनिकांचे घवघवीत यश पाहून आपल्याला अभिमान वाटतो. हृदयात न मावणारा असा एक प्रकारचा हा आनंद असतो. ही पूर्ण तया सकारात्मक भावना आहे. त्यात एक प्रकारची नम्रता आहे.
याउलट गर्व म्हणजे पोकळ अभिमान! गर्व म्हणजे अहंकार, मद! यात मी इतरांहून कोणीतरी श्रेष्ठ आहे, अधिक श्रीमंत आहे, माझे ज्ञान अगाध आहे, माझ्याकडे असलेली वस्तू सहजासहजी दुसऱ्या कुणाकडे असण्याची शक्यता नाही असा फार मोठा गैरसमज या अहंकारात असतो. अशा माणसाला दुसऱ्याचे गुण कधीच दिसत नाहीत, तो त्याच्याच यशात ( सो कॉल्ड) रममाण झालेला असतो, त्याला स्वतः पुढे इतर सर्व तुच्छ वाटतात.
एक साधे उदाहरण सांगते. एखादा मुलगा, अगदी साधारण परिस्थितीतून आलेला, मार्गातील अनंत अडथळे स्वज्ञ- सामर्थ्याने दूर करत करत उच्च शिक्षण घेतलेला, कोणत्याही वशिल्याशिवाय स्वतःच्या हुशारीने नोकरी मिळविलेला, त्या नोकरीत अनुभव घेत घेत, अत्यंत इमानदारीने काम करत राहतो आणि एक दिवस त्याच्याच कंपनीत तो सी.ई.ओ. होतो. ही गोष्ट नक्कीच अभिमानास्पद आहे, त्याने स्वतःचा अभिमान का बाळगू नये?
मात्र या मुलाचा मुलगा पुढे बापाच्या पैशावर उड्या मारतो, आपणही आयुष्यात वडिलांसारखेच काहीतरी करू आणि वडिलांचे नाव राखू अशी भावना न बाळगता, मी तर मोठ्या बापाचा मुलगा आहे, मला काम करायची काय गरज? मी मस्त बंगल्यात राहणार, दरवर्षी गाडी बदलणार, ऐषोआराम करणार. सगळ्या मित्रमंडळीत माझीच वट असली पाहिजे असा त्याला विनाकारण गर्व होतो. त्याला हे कळत नाही की लक्ष्मी चंचल आहे. म्हणून तर मराठीत म्हण आहेच ना?*गर्वाचे घर खाली* हा गर्वाचा फुगा ताणला गेला की तो फुटल्याशिवाय कसा राहील?
पंचपांडवातील भीम हा अत्यंत बलवान होता हे आपल्याला माहीतच आहे. त्याच्यातील बळ ही खरोखरीच एक अभिमानाची गोष्ट होती. त्याने त्याच्या शक्तीच्या जोरावर हिडंब राक्षसाचा वध करून त्या राक्षसाची बहीण हिडींबा हिच्याशी विवाह केला. या गोष्टीचा अभिमान भीमाला नक्कीच होता परंतु कालांतराने या अभिमानाचे गर्वात रूपांतर झाल्यावर काय झाले?
पांडव वनवासात असताना द्रौपदीसाठी सुगंधित फुले आणायला भीम सौगंध पर्वताच्या दिशेने चालला होता. वाटेत एक वृद्ध वानर त्याची लांब शेपूट पसरून झोपला होता. भीमाने त्याला त्याची शेपूट बाजूला सारण्याची विनंती केली, तेव्हा त्या वानराने वृद्धत्वामुळे मी अतिशय क्षीण झालो आहे तेव्हा माझी शेपटी उचलून आपणच बाजूला करावी अशी भीमाला विनंती केली. भीम हसला. त्याच्यासाठी त्या वानराची शेपूट धरून रस्ता मोकळा करणे म्हणजे अगदी हातचा मळ होता. पण प्रत्यक्षात जेव्हा तो शेपूट उचलावयास गेला तेव्हा ती जागची हलेना.
त्याला त्याच्या अंगी असलेल्या हजारो हत्तींच्या बळाचा फार गर्व होता. दोन्ही हातांनी जोर लावला. या महाबली भिमाचे हात कापू लागले, त्याला दरदरून घाम फुटला परंतु शेपूट जागचे हलण्याचे काहीच लक्षण दिसेना.
आयुष्यात स्वतःपेक्षा महाप्रचंड शक्तिशाली दुसराही कोणी आहे याचा अनुभव त्यावेळी भीमाला आला आणि तेव्हापासून भीमाचे गर्वहरण झाले.ते वृद्ध वानर म्हणजे पवनपुत्र
हनुमानजी होते.
स्वतःच्या बुद्धीचा, श्रीमंतीचा, सौंदर्याचा, स्वतःतील कलागुणांचा अभिमान जरूर बाळगावा, परंतु त्याचे रुपांतर कधीही गर्वात होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. आपल्यापेक्षा दुसरा कोणीतरी अधिक श्रेष्ठ असू शकतो हे सत्य कदापी विसरू नये, नाहीतर गर्वहरणाचा क्षण येऊन ठेपलाच म्हणून समजा.
अरुणा मुल्हेरकर, अमेरिका
