वनरक्षक युवतीची सावंतवाडीत आत्महत्या
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू
सावंतवाडी :
सावंतवाडी तालुक्यातील केसरी येथे वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या २२ वर्षीय युवतीने रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेने वनविभागासह परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत युवतीचे नाव आश्लेषा सागर मांगले (वय २२) असे आहे. त्या मूळच्या लाकूडवाडी, ता. आजरा, जि. कोल्हापूर येथील रहिवासी असून बी.एस्सी.पर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते. सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांची वनखात्यात वनरक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. सध्या त्या केसरी, ता. सावंतवाडी येथे वनरक्षक म्हणून कार्यरत होत्या.
रविवारी दुपारी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली असून ते आजरा परिसरातून सावंतवाडी येथे येणार आहेत. या घटनेचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.
