*मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण*
सिंधुदुर्गनगरी : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवान आणि राष्ट्रपुरुषांना त्रिवार नमन करून जिल्हावासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत तसेच देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या प्रवासात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वाटा अत्यंत मोलाचा राहील, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यात पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, कृषी तसेच महिला सक्षमीकरणाच्या कामांना मोठी गती मिळाली आहे, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. शेतकरी आणि मच्छीमारांच्या सक्षमीकरणासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १ हजार ५६९ शेतकऱ्यांना ७ कोटी ७७ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. तसेच अवेळी पाऊस व थंडीमुळे बाधित झालेल्या ४२ हजारांहून अधिक आंबा-काजू बागायतदारांना ७९ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात येत आहे.
‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ अंतर्गत पर्यटन आणि मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नांदगाव येथे भव्य कृषी उत्पन्न बाजार समितीची उभारणी सुरू असून, चिपी विमानतळावरून सिंधुदुर्ग-मुंबई दरम्यान आठवड्याचे सातही दिवस विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे. मौजे शिरोडा-वेळाघर येथे पंचतारांकित ताज प्रकल्प साकारत असून, सागरी सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील १४ संवेदनशील लँडिंग पॉईंट्सवर ‘पोर्टा केबिन’ उभारण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यातील सामाजिक आणि प्रशासकीय विकासाचा आढावा घेताना पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा परिषदेत लवकरच ‘पवित्र’ प्रणालीद्वारे २८२ प्राथमिक शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याचे सांगितले. सुरक्षित प्रवासासाठी ‘अपघातमुक्त सिंधुदुर्ग’ ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तसेच जलसंधारण अभियानांतर्गत २१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य वॉकेथॉनमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक बसविण्यास मदत होत आहे. तरुण पिढीने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा विधायक व सकारात्मक वापर करून नव्या संधींचा लाभ घ्यावा, यशाची शिखरे गाठावीत आणि देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे, असे आवाहनही पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी केले.
ध्वजारोहण सोहळ्यात वंदेमातरम ने सुरुवात झाली. ध्वजारोहण, राष्ट्रगीत झाल्यानंतर राज्यगीत धून वाजवून परेड कमांडर यांनी रिपोर्टिंग केले. यावेळी पालकमंत्री यांनी उपस्थितांना जलसंधारण शपथही दिली. शेवटी पुरस्कार, पोलीस पदक वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री सामंत यांनी केले.
