‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत चोरगे महाविद्यालयात भव्य तिरंगा रॅली
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती व राष्ट्रीय एकात्मतेचा जागर
चिपळूण
डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अंजली ताई चोरगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली.
यावेळी NSS कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने NSS स्वयंसेवक सहभागी झाले. हातात तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत परिसरात जनजागृती केली. ‘हर घर तिरंगा’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’, ‘तिरंग्याचा मान राखू, भारताचा गौरव वाढवू’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्यदिनाचा उत्सव अभिमानाने साजरा करावा तसेच राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा, असा संदेश रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.
या रॅलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी NSS स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
