You are currently viewing राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकॅडमीची दमदार कामगिरी

राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकॅडमीची दमदार कामगिरी

राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकॅडमीची दमदार कामगिरी

९ पैकी ७ खेळाडूंनी पटकावली पारितोषिके; बाळकृष्ण पेडणेकरचा रेटिंग गटात तृतीय क्रमांक

सावंतवाडी :

सातारा येथे विश्वगंगा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या ‘मकरंद आबा पाटील चषक’ राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुद्धीबळ स्पर्धेत सिंधुदुर्गच्या मुक्ताई ॲकॅडमीच्या खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिद्ध करत उल्लेखनीय यश संपादन केले. देशभरातून सुमारे ३७० खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत ॲकॅडमीच्या ९ पैकी तब्बल ७ खेळाडूंनी विविध गटांत पारितोषिके मिळविली.
जिल्ह्याचा अव्वल राष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर याने नऊ फेऱ्यांच्या अटीतटीच्या लढतीत ७ गुणांची कमाई करत रेटिंग कॅटेगरीमध्ये तिसरे स्थान मिळविले. या कामगिरीमुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगमध्ये ११ गुणांची वाढ झाली. उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला रोख पारितोषिक व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
१३ वर्षीय हर्ष राऊळ याने ५.५ गुण मिळवत १५ वर्षांखालील मुलांच्या गटात सहावा क्रमांक पटकावला. त्याच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगमध्ये १७ गुणांची वाढ झाली. याच गटात १३ वर्षीय पुष्कर केळूसकर याने ५ गुणांसह पाचवे स्थान मिळविले.
१२ वर्षीय चिदानंद रेडकरनेही प्रभावी खेळ करत दोन आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंवर मात केली. त्याने ५ गुण मिळवत १३ वर्षांखालील गटात नववे स्थान मिळविले. देवगडचा अवघ्या ७ वर्षांचा आकाश वाटवे याने मोठ्या व अनुभवी खेळाडूंना चांगली लढत देत ३.५ गुणांची कमाई केली आणि ७ वर्षांखालील गटात तिसरा क्रमांक मिळविला.
मुलींच्या गटातही मुक्ताई ॲकॅडमीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. राष्ट्रीय स्तरावरील आपल्या पहिल्याच स्पर्धेत चारुल जाधव हिने ३.५ गुण मिळवत १५ वर्षांखालील गटात आठवे स्थान मिळविले. तर मोहीशा जाधव हिने ९ वर्षांखालील मुलींच्या गटात तिसरा क्रमांक पटकावला. अथर्व वेंगुर्लेकर आणि तेजस वाटवे यांनीही स्पर्धेत उल्लेखनीय खेळ सादर केला.
या यशामागे मुक्ताई ॲकॅडमीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर आणि राष्ट्रीय प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे यांचे मार्गदर्शन लाभले. ॲकॅडमीच्या उपाध्यक्षा स्नेहा पेडणेकर यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे मुक्ताई ॲकॅडमीसह सिंधुदुर्गच्या बुद्धीबळ क्षेत्राचीही प्रतिष्ठा उंचावली असून खेळाडूंवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा