You are currently viewing वृद्धाश्रम

वृद्धाश्रम

*जागतिक साकव्य विकास मंच तथा पारिजात साहित्य समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनिसा सिकंदर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वृद्धाश्रम*

 

ज्यांनी हात धरुनी चालवलं,

दाखविली जगण्याची वाट,

त्यांच्याच आयुष्यसंध्येला का,

वाट्याला यावी एकाकी पहाट?

 

ज्यांनी लेकरांसाठी आयुष्य,

हसत-हसत केलं अर्पण,

त्यांच्याच वृद्ध डोळ्यांमध्ये का,

दाटून यावं अश्रूंचं दर्पण?

 

शिक्षणाने मोठं झालो आपण,

मिळविला मान-सन्मान,

पण त्यागाच्या त्या ऋणापुढे,

कुठे हरवला माणुसकीचा अभिमान?

 

मुलगा असो वा मुलगी,

कर्तव्य दोघांचं समान,

थरथरत्या त्या हातांमध्ये,

असते घराची शान.

 

नको त्यांना महाल सोन्याचा,

नको सुखांचा पसारा,

दोन प्रेमाचे शब्द पुरेसे,

हाच जगण्याचा सहारा.

 

असून त्यांना पाठवता वृद्धाश्रमी,

येईल तुमच्यावरही ही वेळ,

जन्मदात्याला दूर लोटता,

नात्यांचा करू नका खेळ.

 

सर्व काही मिळेल आयुष्यात,

धन-दौलत, मान-सन्मान,

मिळणार नाही पुन्हा आई-बाबा,

ठेवा त्यांच्या मायेची जाण.

 

सारे चेहरे दिसतील भोवती,

सारे आवाज ऐकू येतील,

पण आईची हाक पुन्हा कधी,

कानांवर कुठे पडेल?

 

बाबांचा हात डोक्यावरचा,

पुन्हा कपाळावर फिरणार नाही,

जग कितीही जवळ असलं तरी,

त्यांची ऊब पुन्हा मिळणार नाही.

 

शिक्षण तेच खरं असतं,

जे माणुसकी शिकवतं,

वृद्ध डोळ्यांत आपलं बालपण,

अलगद पुन्हा दिसतं.

 

आज तुम्ही जे पेराल,

तेच उद्या उगवणार,

आजी-आजोबांना दूर करून,

मुलं कोणते संस्कार घेणार?

 

तुमच्या कृतीतूनच घडेल,

उद्याच्या पिढीचा आकार,

आज द्या नात्यांना प्रेमाची ऊब,

होतील मुलांवर संस्कार.

 

नको दया, नको उपकार,

हवा प्रेमाचा सहवास,

शेवटच्या या संध्याकाळी,

फक्त आपुलकीचा श्वास.

 

आई-बाबा म्हणजे घरातले,

संस्कारांचे जिवंत भांडार,

त्यांच्या आशीर्वादाने फुलेल घर,

पिढ्यांचे स्वप्न होतील साकार.

 

म्हणून नात्यांच्या अंगणी,

मायेचा दिवा तेवत ठेवा,

वृद्धाश्रमाची वेळ येण्याआधी,

आई-बाबांना हृदयात जपा!

 

 

अनिसा सिकंदर, दौंड

प्रतिक्रिया व्यक्त करा