दिल्लीत जंतरमंतर मैदानावर जे आंदोलन झाले त्यादरम्यान काही युवक, युवतींनी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना अर्वाच्य भाषेत अपशब्द वापरले. राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला लोकशाहीत विचार स्वातंत्र्य दिले आहे, त्या राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला आपल्या न्याय, हक्कासाठी सरकारी पक्षाला विरोध करण्याचा अधिकार दिला आहे परंतु राज्यघटनेने कोणत्याही भारतीय नागरिकाला सत्ताधारी, विरोधी पक्षात बसलेल्या संसदीय सदस्यांना अर्वाच्य भाषेत अपशब्द वापरण्याचा अधिकार दिलेला नाही. सामान्य जीवनात एखादी व्यक्ती मुद्दाम, निर्दयपणे अमानवी वागत असेल तर त्या व्यक्तीला आपण सर्वजण अपशब्दांचा भडीमार करत असतो. याचा अर्थ आपण संसदीय सदस्यांना असे अपशब्द वापरावे असे होत नाही. असे वागल्याने आपण नैतिक दृष्ट्या गुन्हेगार ठरत असतो. त्यामुळे लोकशाहीचे शास्त्र उचलताना, आपल्याला दिलेल्या स्वातंत्र्याचा गैर वापर कुणीही करू नये. अपशब्द हे व्यक्तीच्या, व्यक्तिगत जीवनाला लांछन लावतात. यातून त्या व्यक्तीची कारण नसताना बदनामी होते. असे जर एखाद्या व्यक्तीला वाटले तर तो अब्रू नुकसानीचा दावा प्रतिवादी व्यक्तीवर लावू शकतो. हा त्या व्यक्तीचा, व्यक्तिगत अधिकार असतो. त्यामुळे युवाशक्तीने आंदोलनाच्या वेळी संयम बाळगून शब्दांचा, घोषणांचा मारा करावा.
लोकशाहीत संघर्ष हा सरकार विरोधात असतो, व्यवस्थे विरोधात असतो, तो कधीही व्यक्तिगत नसतो. म्हणून प्रत्येकाने नागरिक म्हणून आपले विचार मांडताना, आपण काय बोलणार आहोत यावर लक्ष केंद्रित करावे. जर कोणत्याही नागरिकाने याचे भान बाळगले नाही तर मग अशा व्यक्तीला, समूहाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते. लोकशाही मार्गाने प्रत्येक नागरिकाने आंदोलन, निषेध, मोर्चा या सर्व गोष्टी केल्याच पाहिजेत. या सर्व गोष्टी करताना मात्र आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. व्यक्तिगत पातळीवर आपण घरात किंवा मित्र मंडळात जे बोलतो ते सार्वजनिक ठिकाणी राजकीय बाबतीत बोलू नये. म्हणजे कुठल्याही राजकीय व्यक्तीविषयी अपशब्द वापरू नये. जर ती व्यक्ती चुकीची वागली असेल किंवा त्या व्यक्तीकडून भ्रष्टाचार, घोटाळा झाला असेल तर कायदेशीर मार्गाने पुरावे सादर करून किंवा त्या प्रकारचे विचार मांडून आपण त्या व्यक्तीला पदावरून हटवू शकतो, त्या व्यक्तीला तुरुंगात घालवू शकतो. याचा अर्थ असा नाही की, त्याला अर्वाच्य भाषेत अपशब्द वापरून लांछन लावले पाहिजे, असे बोलणे म्हणजे वर सांगितल्या प्रमाणे नैतिक दृष्ट्या गुन्हा आहे.
आज आपण कायद्याच्या राज्यात वावरतो. त्यामुळे कायद्याचा विचार करून आपल्याला वावरणे भाग आहे. असे न वागल्यास आपल्याला भारतीय नागरिक, “म्हणून घेण्याचा काही एक अधिकार नाही”. संघटित युवाशक्तीने माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना अर्वाच्य भाषेत अपशब्द वापरले ते अपशब्द फक्त श्री नरेंद्र मोदींना लागत नाहीत तर ते पंतप्रधान पदालाही लागतात. पंतप्रधान हे पद भारताचे पालक पद आहे. त्यामुळे त्या पदाला सर्व भारतीय नागरिकांनी सन्मान दिला पाहिजे. असा सन्मान भारतीय नागरिकांने दिला नाही. तर तो राष्ट्रद्रोह ठरू शकतो. दुर्दैवाने याचा अर्थ असा होतो की, आंदोलन करणारी युवाशक्ती आतंकी आहे. तरी देखील माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी त्या मुलांना, मुलींना आपलेपणाने माफ केले आहे. ही नैतिकता पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींकडे आहे. कारण श्री नरेंद्र मोदी या माणसात “साधनेचे आध्यात्मिक चैतन्य आहे. यामुळे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या विषयी बोलताना शब्दात आदर बाळगावा. भारतीय संस्कृतीत श्रीकृष्णाने शिशुपालाचे ९९ अपराध माफ केले. हे करताना त्याने शिशुपालला अपशब्द वापरले नव्हते. महात्मा गांधींनी सुद्धा इंग्रजांना विरोध करताना अपशब्दाची भाषा केली नाही. कारण त्यावेळी आणि आजही भारतात कायद्याचे राज्य आहे. या कायद्याच्या राज्यात एखाद्या व्यक्तीने दुष्ट रावणाला जीवे मारले तरी त्या व्यक्तीला कायद्याने शिक्षा होऊ शकते. रावण दुष्ट असला तरीही हे कायद्याचे राज्य आहे. म्हणून सरकारला विरोध करताना वैचारिक, न्यायिक, नैतिक अशा तऱ्हेची कोणतीही आंदोलने करा पण विचार करून बोला, अपशब्द वापरू नका. महात्मा गांधी म्हणाले आहेत, “विचार करून बोला, बोलून विचार करू नका” म्हणजे आपण काय बोलत आहोत, हे समजून बोला.
अॅड रुपेश पवार
9930852165
