You are currently viewing दशावतार कलेतील अभिनयाची दखल; विलास गवस यांना ‘कोकणरत्न पुरस्कार २०२६’

दशावतार कलेतील अभिनयाची दखल; विलास गवस यांना ‘कोकणरत्न पुरस्कार २०२६’

दशावतार कलेतील अभिनयाची दखल; विलास गवस यांना ‘कोकणरत्न पुरस्कार २०२६’

झोळबेच्या सुपुत्राचा सन्मान; दोडामार्ग तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

दोडामार्ग :

दशावतार कलेच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची वेगळी छाप निर्माण करणारे झोळबे गावचे सुपुत्र विलास गवस यांना त्यांच्या उल्लेखनीय कलाविष्काराची दखल घेत ‘कोकणरत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विलास गवस हे गेल्या अनेक वर्षांपासून दशावतार कलेत सक्रियपणे कार्यरत आहेत. विविध भूमिका साकारताना त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. विशेषतः खलनायकाची भूमिका ते अत्यंत प्रभावीपणे साकारत असून, दमदार संवादफेक, हावभाव आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर त्यांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
ग्रामीण भागातील पारंपरिक दशावतार कलेची समृद्ध परंपरा आपल्या अभिनयातून पुढे नेण्याचे काम विलास गवस सातत्याने करत आहेत. त्यांच्या दीर्घकाळच्या दशावतारी सेवेची आणि कलात्मक योगदानाची दखल घेत मिळालेला ‘कोकणरत्न पुरस्कार २०२६’ हा झोळबे गावासह संपूर्ण दोडामार्ग तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल दोडामार्ग पंचायत समितीचे उपसभापती श्री. गणेशप्रसाद गवस यांनी विलास गवस यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील कलाविषयक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दशावतार कलेची परंपरा जपत आपल्या दमदार अभिनयातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या विलास गवस यांच्या या सन्मानामुळे झोळबे गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा