You are currently viewing महावितरणच्या वीजवाहिनीचा शॉक लागून गाभण गाईचा जागीच मृत्यू

महावितरणच्या वीजवाहिनीचा शॉक लागून गाभण गाईचा जागीच मृत्यू

महावितरणच्या वीजवाहिनीचा शॉक लागून गाभण गाईचा जागीच मृत्यू

वेताळ बांबर्डे येथील घटनेत शेतकऱ्याचे ५० हजारांचे नुकसान; ग्रामस्थांमध्ये संताप

कुडाळ :
वेताळ बांबर्डे तिठा-देवमळा (शेतमळा) येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरच्या वीजवाहिनीचा विद्युत प्रवाह लागून गाभण गाईचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकरी रिझवान उस्मान शेख यांचे अंदाजे ४५ ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, पावशी सीमावाडी येथे राहणारे रिझवान उस्मान शेख यांची सात वर्षांची गाभण गाय देवमळा येथील शेतात चरत होती. यावेळी ट्रान्सफॉर्मरच्या वीजवाहिनीचा विद्युत प्रवाह गाईला लागला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
गाभण गाय दगावल्याने शेतकरी रिझवान शेख यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या घटनेनंतर महावितरणच्या वीजवाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीबाबत स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वीजवाहिन्या व ट्रान्सफॉर्मर परिसरातील धोकादायक स्थितीची पाहणी करून आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
महावितरणच्या संभाव्य निष्काळजीपणामुळे पशुधनाचा जीव गेल्याने संबंधित शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा