जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक प्रदीप जोशी लिखित अप्रतिम लेख
*कसा मी… कसा मी?*
अहो मी काय पु. ल. देशपांडे आहे काय? त्यांनी असा मी असा मी पुस्तक लिहले. मी साधा शिक्षक पत्रकार. मला तुम्ही कसा मी कसा मी? वर लिहायला सांगता. असो सांगितले आहेच तर लिहतो.
लोक मला नेहमी विचारतात, “अरे, तू नेमका कसा आहेस. दिसतोस तर हिमनगासारखा. तुला ओळखणे कठीण आहे बुआ.?” हा प्रश्न ऐकला की मी थोडा बावरतो. मग त्यानंतर गोंधळतो. गोंधळणे आणि बावरणे हे माझे स्थायीभाव. कारण मी स्वतःच अजून ठरवू शकलो नाही की मी नेमका कसा आहे! कधी मला वाटतं मी फार शिस्तप्रिय आहे. कधी वाटत बावळट आहे. कधी वाटत खूप हुशार आहे. कधी वेडा तर कधी शहाणा असल्याचा भास होतो. कधी कधी माझ्या टेबलावरचा पसारा पाहून टेबलसुद्धा मला ओळखायला नकार देतं. अहो भल्याभल्याना माझा अंदाज लागला नाही. मला सारेजण हिमनगाची उपमा त्यासाठीच देतात.
लोक मला सतत विचारतात, “तुम्ही नेमके कसे आहात?” हे मला सतत ऐकून घ्यावं लागत.
मी म्हणतो, “माझ्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर माझ्या घरच्यांना विचारा. ते मला रोज नव नवीन नावं ठेवतात!”
आई म्हणते, “हा मुलगा नाही, चालताबोलता गोंधळ आहे.”
बायको म्हणते, “यांच्या डोक्यात मेंदू कमी आणि कल्पना जास्त आहेत.”
मित्र म्हणतात, “हा माणूस संकटातही विनोद शोधतो.”
आणि मी स्वतःबद्दल सांगायचं झालं तर मी असा माणूस आहे की ज्याला स्वतःच्या चुका करण्यासाठी कोणाच्या मदतीची गरज लागत नाही
सकाळी उठण्याच्या बाबतीत मी फार तत्त्वनिष्ठ आहे. रात्री झोपताना “उद्या पहाटे पाच वाजता उठायचं” असा निर्धार करून झोपतो. जाग यावी म्हणून गजर लावतो. पण सकाळी गजर वाजला की माझ्या आणि गजराच्या संघर्षाला सुरुवात होते. गजर ओरडतो, “उठ!” आणि मी त्याला प्रेमाने सांगतो, “अरे, अजून पाच मिनिटं.” ही पाच मिनिटं इतकी वाढतात की सूर्यदेवही डोक्यावर येऊन उभे राहतात.
सकाळी उठण्याच्या बाबतीत माझी शिस्त जगप्रसिद्ध आहे. मी रोज रात्री झोपताना उद्यापासून आयुष्य बदलायचं ठरवतो. गजर पाचचा लावतो.
सकाळी पाचला गजर वाजतो…
मी तो बंद करतो.
पाच दहा वाजता पुन्हा वाजतो…
मी त्याला समजावतो.
पाच वीसला वाजतो…
मी त्याला धमकी देतो.
सहा वाजता वाजतो…
मी त्याच्याशी संबंध तोडतो!
शेवटी आई येऊन म्हणते, “उठणार आहेस की तुझ्या नावाचं श्राद्ध करू?”
मी लगेच उठतो. कारण आईच्या आवाजात असा अलार्म असतो की त्याला Snooze बटन नसतं!
व्यायामाच्या बाबतीत तर माझी कीर्ती फार मोठी आहे. माझ्याकडे जिमचे कार्ड आहे, ट्रॅकसूट आहे, स्पोर्ट्स शूज आहेत, पाण्याची बाटली आहे. फक्त व्यायाम करायचा राहिला आहे! अनेकदा मी सकाळी चालायला जाण्याचा बेत करतो. पण रस्त्यावर गर्दी पाहून चालण्याचे टाळतो.
व्यायामावर माझं प्रेम खूप आहे. यूट्यूबवर व्यायामाचे व्हिडिओ मी इतके पाहतो की प्रशिक्षकांनाही वाटत असेल, “हा माणूस ऑलिंपिकमध्ये जाणार!”
पण प्रत्यक्षात माझा व्यायाम असा असतो…
रिमोट शोधणे, मोबाईल चार्जर शोधणे, आणि जेवण झाल्यावर बेल्ट सैल करणे.
एकदा जिमची मेंबरशिप घेतली होती. जवळपास तीन महिने जिमला गेलो नाही.
जिमवाल्याने फोन करून विचारलं, “सर, तुम्ही जिमचे मेंबर आहात की गुंतवणूकदार?”
खाण्याच्या बाबतीत माझं मन खूप मोठं आहे. कोणत्याही पदार्थाचा मी अपमान करत नाही. समोर येईल त्यावर ताव मारतो. समोसा, वडा-पाव, भजी, पुरणपोळी, आईस्क्रीम जिलेबी चिकन अंडी सर्वांना माझ्या पोटात सन्मानाची जागा आहे. “डाएट” हा शब्द मी अनेकदा उच्चारतो; पण तो फक्त शब्दकोशापुरताच मर्यादित राहतो. जेवणाच्या ताटात एखादा गोड पदार्थ दिसला की माझी इच्छाशक्ती रजा घेऊन जाते.
पैशांच्या बाबतीत मी फार अर्थतज्ज्ञ आहे. महिन्याच्या सुरुवातीला मी खर्चाचे सुंदर नियोजन करतो. वहीत लिहितो, अंदाज बांधतो, बचतीचे तक्ते तयार करतो. पण महिन्याच्या मध्यापर्यंत ते सर्व तक्ते मला पाहून हसत असतात.
मित्रांच्या बाबतीत मात्र मी राजा आहे. मित्रांना सल्ले देण्यात माझा हातखंडा आहे. कोणतीही समस्या असो, माझ्याकडे उपाय तयार असतो. गंमत म्हणजे माझ्याच समस्यांवर हे उपाय लागू पडत नाहीत! मित्र अडचणीत असला तर मी धावून जातो; पण स्वतःच्या अडचणींवर विचार करत बसतो.
मी थोडा विसरभोळाही आहे. घरातून एखादी वस्तू शोधत बाहेर पडतो आणि मध्येच विसरतो की काय शोधत होतो. कधी चष्मा डोक्यावर ठेवून चष्मा शोधत फिरतो. मोबाईल हातात असताना “माझा मोबाईल कुठे आहे?” असा प्रश्न विचारण्याचा विक्रमही मी अनेकदा केला आहे.
रागाच्या बाबतीत मी फार धाडसी आहे. मनात मोठमोठे संवाद तयार असतात. “आज त्याला चांगलंच सुनावणार!” असा निर्धार करून जातो. पण समोरची व्यक्ती हसून बोलली की माझा सगळा राग विरघळून जातो. मग मीच त्याची चौकशी करत बसतो.
असा हा मी! ना फार हुशार, ना फार मूर्ख; ना फार आळशी, ना फार उद्योगी. थोडा गोंधळलेला, थोडा विसरभोळा, थोडा स्वप्नाळू आणि भरपूर विनोदी. माझ्यात अनेक दोष आहेत, काही गुणही आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्की – मी स्वतःला कधी फार गंभीरपणे घेत नाही.
कारण शेवटी, माणूस कितीही मोठा झाला तरी स्वतःवर हसता आलं पाहिजे. आणि हेच माझं खरं व्यक्तिमत्त्व आहे. म्हणूनच मी अभिमानाने म्हणतो –
“कसा मी? तर अगदी साधा, सरळ, थोडा वेडा, थोडा शहाणा आणि पूर्णपणे ‘मी’!”
मला अन्न वाया घालवणं अजिबात आवडत नाही. म्हणून माझ्या ताटातलं मी संपवतो. शेजारच्याच्या ताटातलंही संपवतो. आणि उरलं तर फ्रिजमधलंही!
डाएट सुरू करण्याचा मी अनेकदा प्रयत्न केला आहे.
पण माझं आणि डाएटचं नातं म्हणजे निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनांसारखं आहे.
खूप बोललं जातं.पण काहीच होत नाही! मी रोज एक पदार्थ सोडतो. आठ दिवसात तो पुन्हा माझ्या खाण्याच्या यादीत असतो.
कुणावर प्रेम करणं मला जमतच नाही. आवाज खणखणीत असल्याने प्रेम करतोय की भांडतोय असेच सर्वाना वाटते. तर मी हा असा, माझं हे अस, आता पुढे कस अस म्हणत दिवस ढकलतोय.
प्रदीप जोशी, विटे, जि. सांगली
मोबाईल 9881157709
