गोव्यातील माशेल येथे भीषण अपघात; डिंगणेतील महादेव सावंत यांचा जागीच मृत्यू
कामावर जात असताना जीपची दुचाकीला जोरदार धडक; चालकासह तिघे पोलिसांच्या ताब्यात
बांदा
सावंतवाडी तालुक्यातील डिंगणे येथील महादेव चंद्रकांत सावंत (वय ४५) यांचा गोव्यातील माशेल येथे झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
महादेव सावंत हे नेहमीप्रमाणे डिंगणे येथून दुचाकीवरून गोव्यात कामासाठी जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या जीपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच गोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी जीप चालकासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
महादेव सावंत यांच्या अकाली निधनाने डिंगणे परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
