You are currently viewing सिंधुदुर्ग महाविद्यालयात विकसित भारतासाठी नशामुक्त युवा अभियान संपन्न
Oplus_16908288

सिंधुदुर्ग महाविद्यालयात विकसित भारतासाठी नशामुक्त युवा अभियान संपन्न

मालवण :

कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे “नशामुक्त युवा – विकसित भारत” अभियानांतर्गत विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

दि. ३१ जुलै २०२६ रोजी महाविद्यालय परिसरात “नशामुक्त युवा फॉर विकसित भारत – जनजागृती स्वाक्षरी अभियान” आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालयात आकर्षक संदेश व चित्रांसह जनजागृती फलक उभारण्यात आला होता. या फलकावर विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी करून नशामुक्त समाज घडविण्याचा निर्धार व्यक्त केला. या अभियानात एकूण ८३ जणांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये ६७ विद्यार्थी व एनएसएस स्वयंसेवक तसेच १६ प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश होता.

त्यानंतर दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी महाविद्यालयाच्या टी. वाय. बी.कॉम. स्मार्ट क्लासरूममध्ये “नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान” या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास ५५ एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान भारताचे पंतप्रधान यांनी देशातील युवकांना संबोधित करताना नशामुक्त जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे आणि विकसित भारताच्या निर्मितीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

थेट प्रक्षेपणानंतर प्रभारी प्राचार्य श्री. कैलास राबते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्यसनमुक्ती, स्वअनुशासन आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहून समाजात जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर उपस्थित सर्वांनी “नशामुक्त युवा शपथ” घेऊन व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी कार्य करण्याचा संकल्प केला.

या उपक्रमांमुळे युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण झाली असून, निरोगी, सुदृढ आणि विकसित भारत घडविण्याच्या राष्ट्रीय अभियानाला महाविद्यालयाने प्रभावी योगदान दिले.

या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ. सुमेधा नाईक, डॉ. संकेत बेळेकर, प्रा. योगिता सावंत, प्रा. अनघा टिकले, गौतम मानवर, रिद्धी काजरेकर व अपूर्वा पालव यांनी केले. याप्रसंगी प्रा. मंदार मुंडले तसेच मालवण नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा