You are currently viewing धरपकड…
Oplus_16908288

धरपकड…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*धरपकड…*

 

मी लहान होते. वडील ४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत होते. माझ्या जन्मापासूनच ते

कापडण्याला स्थायिक झाले होते.तो पर्यंतचे

सारे आयुष्य धरपकडीतच गेले होते. स्थायिक

झाल्यावर, मला समजायला लागले तसे घरात

चाललेले बोलणे माझ्या कानावर पडत असे.

चळवळ म्हणजे धरपकड नेहमीचीच.

 

ब्रिटिश सरकार आपल्या क्रांतिकारकांवर अगदी

दात खाऊन होते. त्यांच्या अत्याचारांना तर सीमाच नव्हती. माझे आईवडील दोघेही क्रांतिकार्यात सक्रिय होते. पोलिसांचा ससेमिरा तर चोविसतास असायचा. भारतभर धरपकड

चालू होती. अगदी तिरंगा फडकवला, वंदेमातरंम

म्हटले तरी पकडले की टाका तुरुंगात. त्यांना

देशभक्तांना पकडण्यासाठी कोणतेही कारण पुरत असे. माझे वडील तर शालेय जीवनातच

क्रांतिकार्यात ओढले गेले होते. तसेच यशवंतराव

चव्हाणही. त्यामुळे माझ्या वडिलांच्या बऱ्याच

तुरुंगवाऱ्या व शिक्षाही झाल्या.

 

माझी आई दिल्ली, आग्रा, चांदा-बांदा अशी वडिलांबरोबर पळत होती. पोलिसांच्या धरपकडीच्या भीतीमुळे रातोरात चार घरे सुद्धा

बदलावी लागत. सक्रिय कार्यकर्ते तर सारखे पकडले जात. यात भगतसिंग, राजगुरू, मदनलाल, सावरकर, सानेगुरुजी व देशपातळीवरील अनेक नेत्यांची नावे आपल्याला

माहीत आहेत. त्यांच्या पाठीमागे सदैव हे धरपकडीचे सत्र असे पण म्हणून त्यांनी आपले

कार्य सोडले नाही.

 

गावागावात, शहरातही चोर पकडून नेतांनाची दृश्ये आपण पहातो. कित्येकवेळा मोठ्या शहरात लाठीमार व नंतर धरपकड होते.चोर

दरोडेखोरांची धरपकड तर नेहमीचीच आहे.

गमतीचा म्हणावा असा एक भाग म्हणजे आमच्या गावात कापडण्याला नदीच्या पलीकडे

वडारांची वस्ती होती. दर आठपंधरा दिवसात त्यांची डुकरांची धरपकड मोहिम असे. हातात

मोठमोठे फासे घेऊन डुकरं पुढे नि ते मागे असा

दिवसभर त्यांचा धुमाकूळ चालत असे. एक/दोन

डुकरं त्यांच्या पकडीत आली की मग त्यांना जेरबंद करून खांद्यावर त्यांचे मुटकुळे घेऊन ते

वस्तीवर परतत व मोठ्ठा जाळ करून त्यावर डुकराला टांगून त्याला भाजून खात असत. ही

धरपकड सुरू झाली की आम्ही जीवमुठीत धरून

ओट्यावरून त्यांची गंमत पहात असू.

 

मुकेप्राणी बिचारे.त्यांच्या नशिबी ही धरपकड

कायमच असते. त्यांना पकडण्याचा जणू आम्हाला जन्मसिद्ध हक्कच आहे असे आम्ही

समजतो. त्यांना बंधनात कैदेत ठेवतो. त्यांच्या

धरपकडीच्या, कैदेच्या नाना क्लृप्त्या शोधून

काढतो. तसे तर ही धरपकड निसर्गातील बरेच

जीव करतात हे आपण पाहतो. “जीवो जीवस्य

जीवनंम्” या न्यायाने सरडा कुंपणावर बसून

आपली लांब जीभ क्षणात बाहेर काढून भक्ष

पकडतो. तसेच एक साधा कोळी आपल्या लाळेतून सुंदर जाळे, (अगदी फुटपट्टीने मोजून

घ्या असे)विणून मधमाशा, भुंगे, कीटक यांना

पकडून जेरबंद करतो व मटकावतो. ही धरपकड

आपल्या नजरेने आपण पाहतो व त्यात काही

गैर आहे असे मुळीच आपल्याला वाटत नाही.

 

आपणही मासे खेकडे पकडतो, दिसताच झडप

घालतो, जाळे टाकतो, घरात फिशटॅंकमध्ये मासे

पकडून ठेवतो व मनोरंजन करतो, पोपटाला पकडून पिंजऱ्यात बंद करतो. खरे तर ही काय नि दुसरी काय, धरपकड वाईटंच.

पण गुन्हेगारांना न पकडून कसे चालेल? वॅारंट

काढून ती धरपकड करावीच लागते.

 

समाजात ह्या दुष्प्रवृत्ती आहेत म्हणून ही धरपकड

करावी लागते. वास्तविक माणसाला इतका महान मेंदू मिळाला आहे की, त्याने असा वेडावाकडा विचार करायलाच नको. पण नाही,

आम्हाला भिकेचेच डोहाळे लागतात ना! सकारात्मक विचारांऐवजी दुष्ट विचार केला तर

गुन्हेगारी वाढते व मग समाजस्थैर्यासाठी सरकारला अशी कठोर पावले उचलावी लागतात.

कधी कधी या व्यवस्थेत मग निरपराधही भरडले

जातात हे खरे आहे.

 

आता स्वातंत्र्यसैनिक पकडले जात यात त्यांचा

काय दोष होता. ही धरपकड पाठीशी लागल्यामुळे माझ्या वडिलांना कित्येक महिने

भूमिगत राहून कार्य करावे लागले.

 

आजकाल तर नीतिमत्ता पार ढासळून वेगळ्याच नको त्या कारणांसाठी तरुणांची धरपकड करावी लागते ही अत्यंत शरमेची बाब आहे. या

विषयावर बोलायला जीभ धजत नाही.

 

थोडक्यात कुत्री,मांजरी, गाईम्हशी, वाघ, बकरी माणूस

कुणाला धरपकड चुकली हो! आणि शेवटी आपण कितीही लपायचा प्रयत्न केला तरी यमराज आपल्याला पकडतोच ना? तिथून तर मग आपली कधीच सुटका होत नाही. हो, मोक्ष कुणी पाहिला हो? असे आहे

हे धरपकड प्रकरण, कुणालाही न चुकलेले.

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा