सिंधुदुर्गच्या मंगेश राणे यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार
कोळोशी ग्रामपंचायत अधिकारी मंगेश राणे यांची सन २०२४-२५ च्या प्रतिष्ठेच्या राज्य पुरस्कारासाठी निवड; कणकवली तालुक्यासह जिल्ह्याचा गौरव
फोंडाघाट,
ग्रामपंचायत प्रशासनातील उल्लेखनीय कार्य, लोकाभिमुख सेवा आणि ग्रामीण विकासासाठी दिलेल्या भरीव योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने सन २०२४-२५ चा राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार कोळोशी ग्रामपंचायत अधिकारी मंगेश अनंत राणे यांना जाहीर केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातून या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाल्याने तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचा गौरव झाला आहे. मंगेश राणे हे सध्या कोळोशी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी असून फोंडाघाट ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभारही ते सांभाळत आहेत.
बी.एस्सी. (फॉरेस्ट्री) चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मंगेश राणे यांनी ग्रामसेवक म्हणून शासकीय सेवेला सुरुवात केली. गेल्या २३ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी विविध ग्रामपंचायतींमध्ये पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण केला आहे.
जानवली व फोंडाघाट ग्रामपंचायतींमध्ये ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी ग्रामविकास, स्वच्छता, प्रशासनातील शिस्त, शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांना तत्पर सेवा उपलब्ध करून देण्यात उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या कार्यामुळे विकासकामांना गती मिळाली तसेच ग्रामपंचायत प्रशासनाविषयी नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला.
प्रशासकीय कामकाजाबरोबरच त्यांनी संघटनात्मक स्तरावरही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. ग्रामसेवक संघटनेचे तालुका सचिव तसेच जिल्हा सहसचिव म्हणून कार्य करताना ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामसेवकांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी प्रभावीपणे आवाज उठविला. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे संघटनात्मक कार्यातही त्यांनी वेगळी छाप निर्माण केली.
सध्या कोळोशी ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेले मंगेश राणे प्रशासन अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.
राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कारासाठी त्यांची झालेली निवड ही कणकवली तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात असून विविध सामाजिक, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
