सावंतवाडीत घनकचरा व्यवस्थापन नियमांची कडक अंमलबजावणी; कचऱ्याचे चार प्रकारांत वर्गीकरण बंधनकारक
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; नागरिक, व्यापारी व संस्थांनी नगरपरिषदेला सहकार्य करण्याचे आवाहन
सावंतवाडी :
सावंतवाडी शहर स्वच्छ, निरोगी, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने सावंतवाडी नगरपरिषदेने घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ ची शहरभर काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. यासंदर्भात नगरपरिषदेने जाहीर सूचना प्रसिद्ध करत शहरातील सर्व नागरिक, व्यापारी, गृहनिर्माण संस्था तसेच व्यावसायिक आस्थापनांना कचऱ्याचे वर्गीकरण करूनच तो संकलन वाहनाकडे देणे बंधनकारक केले आहे.
नगरपरिषदेच्या सूचनेनुसार घरगुती व व्यावसायिक कचरा चार प्रकारांत वर्गीकृत करावा लागणार आहे. भाजीपाला, फळांची साले, उरलेले अन्न आदी जैविक कचरा ओल्या कचऱ्यात; कागद, प्लास्टिक, काच व पुठ्ठा सुक्या कचऱ्यात; सॅनिटरी पॅड, डायपर्स व मास्क स्वतंत्र पिशवीत बांधून सॅनिटरी कचऱ्यात; तर बॅटरी, बल्ब, औषधे, रंगाचे डबे आणि कीटकनाशके घातक कचऱ्यात जमा करूनच नगरपरिषदेच्या वाहनाकडे सुपूर्द करावे लागतील.
नगरपरिषदेने २०,००० चौरस मीटरपेक्षा अधिक बिल्ट-अप क्षेत्रफळ असलेल्या इमारती, दररोज ४० हजार लिटरपेक्षा अधिक पाण्याचा वापर करणाऱ्या संस्था किंवा दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांना ‘बल्क वेस्ट जनरेटर’ म्हणून घोषित केले आहे. अशा हॉटेल्स, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि व्यापारी संकुलांनी त्यांच्या परिसरातच ओल्या कचऱ्यावर कंपोस्टिंग किंवा बायोगॅसद्वारे प्रक्रिया करणे अनिवार्य राहणार असून, सुका कचरा पुनर्प्रक्रियेसाठी अधिकृत संस्थेकडे किंवा नगरपरिषदेकडे द्यावा लागणार आहे.
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, नाले किंवा जलस्रोतांमध्ये कचरा टाकणे, ओला व सुका कचरा एकत्र करणे, कचरा जाळणे, बांधकामाचा ढिगारा टाकणे तसेच कचरा संकलन वाहनास सहकार्य न करणे यावर सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ‘पोल्युटर पेझ प्रिन्सिपल’नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नगरपरिषदेने दिला आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने घरगुती स्तरावर कचरा वर्गीकरण करून नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
