You are currently viewing थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 सिंधुदुर्गनगरी

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ व उपकंपन्यांमार्फत इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) मधील 18 ते 55 वयोगटातील महिला व पुरुषांसाठी 1 लाख रुपये थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यास 160 लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी केले आहे.

महामंडळामार्फत राबविण्यात येणारी थेट कर्ज योजनेची कर्ज मर्यादा रक्कम रूपये 1 लाख पर्यंत आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी हा नियमित 48 महिने (4 वर्षे) इतका असून 2 हजार 85 रुपये या मासिक हप्त्यांमध्ये परतफेड करायची आहे. नियमित हप्त्यांची परतफेड करण्याऱ्या लाभार्थीना शुन्य टक्के व्याजदर लागू राहील.

या योजनेद्वारे मत्स्य व्यवसाय, कृषी क्लिनिक, सायबर कॅफे, संगणक प्रशिक्षण केंद्र, झेरॉक्स सेंटर, ब्युटी पार्लर, मसाला उद्योग, पापड उद्योग, वडापाव विक्री केंद्र, भाजी विक्री केंद्र, चहा विक्री केंद्र, हॉटेल, गॅरेज, इलेक्ट्रिकल शॉप, मोबाईल रिपेअरिंग व्यवसाय, किराणा दुकान, कृषी संलग्न व्यवसाय तसेच कायदेशीररित्या सुरू करता येणाऱ्या इतर कोणत्याही व्यवसायासाठी कर्जाचा लाभ घेता येणार आहे.

अर्जदार हा इतर मागासप्रवर्गातील असावा. अर्जदाराकडे तहसिलदार यांचेकडून प्राप्त झालेला ओबीसी प्रवर्गाचा दाखला असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय हे 18 ते 55 वर्षे पर्यंत असावे. अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाखापेक्षा जास्त नसल्याचे प्रमाणपत्र असावे.(तहसिलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला), महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला असावा. (वय अधिवास प्रमाणपत्र), अर्जदाराचे आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, वयाचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला, व्यवसायाचा जागेचा पुरावा, व्यवसायाचे कोटेशन, उद्यम आधार, लाभार्थीचा सिबील स्कोर 500 पेक्षा अधिक असावा तसेच व्यवसायाबाबत आवश्यक असलेले इतर कागदपत्रे तसेच महामंडळाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. जिल्हा कार्यालयाच्या ऑनलाईन पोर्टलवर अर्जदाराने कागदपत्रांच्या प्रती अपलोड कराव्यात व अर्ज छानणीकरीता जिल्हा कार्यालयामध्ये जमा करावा.

या योजनेतील कर्जाचे वाटप महामंडळाकडून होणार असल्याने लाभार्थीच्या आधारलिंक बचत खात्यामध्ये जमा करण्यात येतो. या योजनेमध्ये लाभार्थीला कर्ज वाटप करतेवेळी महामंडळाला आवश्यक असणाऱ्या वैधानिक कागदपत्रांतील अटी व शर्तींमध्ये काही प्रमाणात शिथीलता करण्यात आली आहे. यामध्ये लाभार्थीच्या नावे असणारा घरपत्रक उतारा (नमुना 8अ) किंवा शेतजमीन सातबारा यावर महामंडळाचा बोजा नोंद करून मिळकतीचे मुल्यांकन सादर केल्यास या योजनेचा लाभ घेता येईल किंवा एक जामीनदार शासकीय कार्यालयातील कायमस्वरूपी कर्मचारी असावा व  शासकीय सेवा किमान 5 वर्षे शिल्लक असणे आवश्यक आहे.

पात्र उमेदवारांनी महामंडळाच्या www.msobcfdc.org या वेबसाईट वर उपकंपन्यांमध्ये  थेट कर्ज 1 लाख रुपये या योजनेत अर्ज दाखल करावेत.  किंवा शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग येथे कर्ज अर्ज उपलब्ध आहेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, सिंधुदुर्ग याठिकाणी भेट देवून अथवा कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02362-228119 या क्रमांकावर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा