वाडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर; अवघ्या १२ तासांत दोन सख्ख्या भावांचे निधन
ज्येष्ठ पत्रकार, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख उत्तम (भास्कर) वाडकर यांचे उपचारादरम्यान निधन; धाकटे बंधू उदय वाडकर यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर काही तासांतच दुःखद वार्ता
सावंतवाडी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तसेच ‘साप्ताहिक संघटन’चे राष्ट्रीय नेते उत्तम उर्फ भास्कर सूर्यकांत वाडकर (वय ७२, रा. खासकीलवाडा, सावंतवाडी) यांचे रविवारी सायंकाळी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असतानाच वाडकर कुटुंबावर नियतीने आणखी एक मोठा आघात केला.
उत्तम वाडकर यांच्या निधनाच्या अवघ्या १२ तासांपूर्वी त्यांचे धाकटे बंधू उदय सूर्यकांत वाडकर (वय ६२) यांचे शनिवारी निधन झाले होते. रविवारी सकाळी उदय वाडकर यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर काही तासांतच कोल्हापूर येथे उपचार घेत असलेल्या उत्तम वाडकर यांच्या निधनाची बातमी आली. त्यामुळे अवघ्या एका दिवसात दोन सख्ख्या भावांचे निधन झाल्याने वाडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
उत्तम वाडकर यांनी पत्रकारिता क्षेत्रात अनेक वर्षे उल्लेखनीय कार्य केले. ‘साप्ताहिक संघटन’चे राष्ट्रीय नेते म्हणून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख म्हणूनही त्यांनी राजकीय क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावत जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या स्पष्टवक्तेपणा, सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारितेतील योगदानामुळे त्यांना जिल्हाभरात मानाचे स्थान प्राप्त झाले होते.
धाकटे बंधू उदय वाडकर हे अनेक वर्षे प्रोफेशनल कुरिअर सेवेशी संबंधित होते. त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून कुटुंबीय सावरत नाहीत, तोच मोठे बंधू उत्तम वाडकर यांच्या निधनाची दुःखद वार्ता आल्याने सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
या दुहेरी दुःखद घटनेमुळे राजकीय, सामाजिक, पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाडकर कुटुंबीयांचे सांत्वन करत दोन्ही बंधूंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
