ओसरगाव टोल नाक्यावर विद्यार्थ्यांना श्रद्धांजली; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनकर्त्यांचे समाधान
सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा; युवा पिढीच्या एकजुटीचे ग्रामस्थांकडून कौतुक
ओसरगाव :
शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर श्री सोनम वांगचूक यांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत ओसरगाव टोल नाका येथे ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध करण्यात आला.
सभेत लाठीचार्जमध्ये मृत्युमुखी पडलेल्या अंकिता तसेच आत्महत्या केलेल्या २२ विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत देशभरातील युवकांनी केलेल्या आंदोलनामुळे शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी उभ्या राहिलेल्या युवा पिढीच्या एकजुटीचे उपस्थितांनी जाहीर अभिनंदन केले.
या श्रद्धांजली सभेला बबली राणे, प्रमोद कावले, प्रदीप तळेकर, नितीन धुरी, पोलीस पाटील सौ. संजना आंगणे, रोटरी अध्यक्ष दीपक आळवे व परिवार तसेच ओसरगावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
