सावंतवाडी :
“आज सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रात अग्रस्थानावर आहे, त्याचे खरे श्रेय येथील समर्पित आणि कर्तव्यदक्ष शिक्षकांना जाते. शिक्षकांच्या अथक परिश्रमाची आणि विद्यार्थ्यांच्या यशाची दखल घेणारी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना विविध उपक्रमांद्वारे उल्लेखनीय कार्य करत असून तिचे कार्य कौतुकास्पद आहे,” असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सावंतवाडी तालुक्याच्या वतीने मांगीरीश बँक्वेट हॉल येथे आयोजित ‘विद्यार्थी-शिक्षक गुणगौरव व सन्मान सोहळ्या’त ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव, गटशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष महादेव देसाई, राज्य सदस्य सृष्टी पाटील, राजा कविटकर, संघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वळवी, जिल्हा सचिव महेश पालव, महिला सेल जिल्हाध्यक्ष तेजस्विता वेंगुर्लेकर, भिवा सावंत, रामा गावडे, बाबाजी झेंडे, सुभाष सावंत, प्रमोद पावसकर, संजय शेडगे, भावना गावडे, मृगाली पालव आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात सावंतवाडी तालुक्यातील प्राथमिक शाळांमधील सर्व शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याचबरोबर चालू शैक्षणिक वर्षात विविध स्तरांवर उल्लेखनीय कार्य करून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केलेल्या शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच नुकत्याच झालेल्या विभागीय स्पर्धा परीक्षेत यश मिळवून केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) पदावर नियुक्ती झालेल्या सावंतवाडी तालुक्यातील शिक्षकांचाही अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी केलेल्या योगदानाचे कौतुक केले. कार्यक्रमास तालुक्यातील शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
