लायन्स क्लब मालवणची किल्ले राजकोट येथे स्वच्छता मोहीम; नगरपरिषदेसह संयुक्त उपक्रम
सामाजिक बांधिलकी जपत परिसर स्वच्छतेचा संदेश; पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
मालवण | प्रतिनिधी :
लायन्स क्लब मालवण आणि मालवण नगरपरिषद आरोग्य व स्वच्छता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक उपक्रमांतर्गत ऐतिहासिक किल्ले राजकोट परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे परिसराची स्वच्छता करत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमात लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, सेक्रेटरी पुनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर, जयश्री हडकर, रूपा कांदळगांवकर, बाबल कवठकर तसेच मालवण नगरपरिषदेचे मुकादम आनंद वळंजु, बाळकृष्ण जाधव आणि नगरपरिषदेचे कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. सर्वांनी मिळून किल्ले राजकोट परिसरात स्वच्छता करून परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश दिला.
लायन्स क्लब मालवणच्या वतीने सातत्याने विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून ही स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली. या उपक्रमाचे नागरिकांकडूनही स्वागत करण्यात आले.
