मळगाव मेटा येथे माकड आडवे आल्याने दुचाकी अपघात; जखमीला दीपक गवस यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले
अजित खडपकर गंभीर जखमी; उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू, जीवनरक्षा प्रतिष्ठानचेही सहकार्य
सावंतवाडी
मळगाव मेटा येथे आज सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास चालत्या दुचाकीसमोर अचानक माकड आडवे आल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार अजित खडपकर (वय ४६) हे गंभीर जखमी झाले.
अपघातात त्यांच्या तोंडाला तसेच हात-पायांना गंभीर दुखापत झाली. याचवेळी घटनास्थळावरून जात असलेले भाजपचे जिल्हा परिषद सदस्य तथा दोडामार्ग तालुकाध्यक्ष दीपक गवस यांनी तत्परता दाखवत जखमी खडपकर यांना आपल्या वाहनातून तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच त्यांच्या नातेवाईकांनाही घटनेची माहिती देण्यात आली.
उपजिल्हा रुग्णालयात डॉ. ओमकार कोल्हे व डॉ. राजकुमार हे जखमीवर उपचार करत आहेत. यावेळी जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर तसेच रवी जाधव यांनीही मदतकार्यामध्ये सहकार्य केले.
दीपक गवस यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे जखमीला वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्यांच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
