You are currently viewing अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी लेखी हमी नंतर वीज ग्राहक संघटनेचे उपोषण स्थगित

अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी लेखी हमी नंतर वीज ग्राहक संघटनेचे उपोषण स्थगित

कुडाळ (प्रतिनिधी):

 

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेने जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली ग्राहकांच्या हककासाठी व महावितरणच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात महावितरणचे मुख्य कार्यालय, एमआयडीसी, कुडाळ समोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. सकाळी ९.०० वाजता सुरू झालेल्या उपोषणाला जिल्हाभरातून जवळपास अडिजशे वीज ग्राहकांनी सहभागी होत महावितरणच्या व्यवस्थे विरोधात आवाज उठविला. जिल्ह्यातील काही राजकीय पक्षांनी देखील आपल्या पाठिंब्याची पत्रे वीज ग्राहक संघटनेला देत उपोषणात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी वीज ग्राहक संघटना जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट, उपाध्यक्ष ॲड.नितीन म्हापणकर, दीपक पटेकर, जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, राजेश राजाध्यक्ष, व्यापारी महासंघ कार्यवाह नितीन वाळके, प्रसाद रेगे आदी उपस्थित होते.

सकाळी उपोषणाला सुरुवात झाल्यानंतर तासाभराने महावितरणचे शिष्टमंडळ उपोषणकर्त्यांच्या भेटीला आले. यात कार्यकारी अभियंता श्री.दिनोरे, श्री.तनपुरे, श्री.मिसाळ, कुडाळचे सहा.अभियंता पाटील यांचा समावेश होता. संघटना पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असताना उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे किंवा नाकारण्याचे अधिकार आपल्याला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर ज्यांना अधिकार आहेत त्या अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना बोलविण्यास सांगितले.

*अधीक्षक अभियंत्यांच्या अरेरावीमुळे उपोषणात गरमागरमी*
अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत चर्चा सुरू असताना जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट शांततेत बोलत असताना “आवाज खाली ठेवा” अशी बोट दाखवून अरेरावीची भाषा केल्याने वीज ग्राहक आक्रमक झाले. त्यामुळे अधीक्षक अभियंता यांनी उपोषण स्थळावरून काढता पाय घेत आपली केबिन गाठली. अधीक्षक अभियंता यांची बोलण्याची सुरुवात चुकीची होती हे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील मान्य केलं.
उपोषणकर्त्या वीज ग्राहक संघटनेने थेट मंत्रालय पातळीवर संपर्क साधून सदरची घटना कथन केली. कुडाळच्या पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी उपोषण स्थळी भेट देत समस्या जाणून घेतल्या व अधीक्षक अभियंता यांच्याशी देखील चर्चा करून उपोषणाबाबत सुवर्णमध्य काढून योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

*अधीक्षक अभियंता यांनी अरेरावी बद्दल उपोषण स्थळी येऊन दिलगिरी व्यक्त करावी: वीज ग्राहकांची मागणी*
अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी उपोषण स्थळी येऊन आपल्या वर्तनाबद्दल दिलगिरी व्यक्त करून मागण्यांवर लेखी उत्तर द्यावे अशी भूमिका वीज ग्राहक संघटनेने घेतली. परंतु दुसऱ्यांदा उपोषण स्थळी येण्यास व माफी मागण्यास अधीक्षक अभियंता तयार नसल्याने उपोषण तसेच सुरू राहिले.

*शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष संदेश पारकर यांची उपोषणाला भेट… समन्वयाची भूमिका*
दरम्यान शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष संदेश पारकर यांनी दुपारी उपोषण स्थळी भेट देत वीज ग्राहक संघटनेशी सविस्तर चर्चा केली आणि उपोषणाबाबत चर्चेतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कुडाळच्या पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला, संदेश पारकर, धीरज परब यांनी अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा करून वीज ग्राहकांच्या मागण्यांवर विचार करण्यास सांगितले. त्याचप्रमाणे घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करावी अशीही मागणी केली. अखेर अधीक्षक अभियंता यांनी आपण दिलगिरी व्यक्त करणार नाही परंतु आपले अधिकारी महावितरण कडून दिलगिरी व्यक्त करतील असे सांगत उपोषणस्थळी येत वीज ग्राहक संघटनेशी सविस्तरपणे शांततेत चर्चा करून आपल्या अधिकारात आहेत त्या सर्व मागण्यांवर आपल्या अधिकाऱ्यांना सांगून तातडीने उपाययोजना करतो असे लेखी उत्तर दिले व इतर मागण्यांबाबत अहवाल वरिष्ठांना पाठविण्याची ग्वाही दिली.

अधीक्षक अभियंता यांच्या लेखी आश्वासनानंतर वीज ग्राहक संघटनेने तूर्तास उपोषण स्थगित केले. उपोषणाच्या सकारात्मक निर्णयासाठी शिवसेना नेते संदेश पारकर, कुडाळच्या पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला आदींचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
वीज ग्राहक संघटनेच्या उपोषणाला विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्याचप्रमाणे उपोषणासाठी वीज ग्राहक संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य, कुडाळ तालुकाध्यक्ष गोविंद सावंत, सचिव किरण शिंदे, मा.नगराध्यक्षा आफ्रिन करोल, मंदार शिरसाट, प्रसाद शिरसाट, राजन नाईक, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, सचिव संजय नाईक, बाळा परब, अनिल गोवेकर, समीर शिंदे, समीर माधव, कृष्णा गवस, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संजय गावडे, सचिव जयराम वायंगणकर, हेमंत दाभोलकर, शिवराम आरोलकर आणि तालुका कार्यकारिणी सदस्य, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुभाष दळवी, सचिव दशरथ मोरजकर, सहसचिव भूषण सावंत, लक्ष्मण आयनोडकर, विजय जाधव, कणकवली तालुका अध्यक्ष दादा कुलकर्णी, देवगड तालुकाध्यक्ष दिनेश पटेल, मालवण तालुकाध्यक्ष समीर म्हाडगुत, चांदणी कांबळी(नगरसेविका), नयना मांजरेकर (नगरसेविका), विवेक खानोलकर व्यापारी संघ अध्यक्ष वेंगुर्ला, अक्षता खटावकर(नगराध्यक्ष कुडाळ), द्वारकानाथ घुर्ये, धीरज परब, संजय वेंगुर्लेकर (भाजपा तालुकाध्यक्ष), बंड्या सावंत, राजू राऊळ (भाजपा), सुनील बांदेकर (मा.नगरसेवक), दीपक बेलवलकर(व्यापारी संघ अध्यक्ष कणकवली), संदीप तेंडुलकर (अध्यक्ष टू व्हीलर मेका.), भास्कर परब, विश्वनाथ घुर्ये, सुधीर चव्हाण(नाभिक संघटना),सौ.स्नेहा मुळीक(सरपंच,धाकोरे), दिव्या साळगावकर (कणकवली),यांच्यासह जिल्हाभरातील असंख्य वीज ग्राहक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा