You are currently viewing असाही एक पाडवा
Oplus_16908288

असाही एक पाडवा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*

 

*असाही एक पाडवा!*

 

 

काही आठवणी अशा असतात की त्या मनाच्या एका कोपऱ्यात कायमच्या घर करून राहतात. त्यामुळे कधी मन सुखावते, तर कधी नकळत डोळ्यांच्या कडा ओलावतात. त्या दिवशीही तिच्या मनात आठवणींची अशीच गर्दी झाली होती.

पाडव्याच्या आदल्या दिवसापासूनच ती अस्वस्थ होती. जुन्या आठवणींचे गाठोडे अचानक सुटले होते आणि त्यातील प्रत्येक आठवण तिच्या मनाला भूतकाळात घेऊन जात होती. मात्र, याच आठवणींच्या गर्दीत तिच्या डोळ्यासमोर एक आठवण अशी आली की, अचानक तिचे मन शांत झाले. बराच वेळ ती त्याच विचारात हरवून राहिली, आणि अखेर तिने मनाशी काहीतरी ठरवले.

पाडव्याची सकाळ उजाडली. घरात रोजच्याप्रमाणे लगबग सुरू होती. सुनेने फराळासाठी गरमागरम चकल्या केल्या होत्या. मुलांच्या आणि नवऱ्याच्या आवडीचे छान जेवणही बनवले होते.

दिवस सरत होता. संध्याकाळी रांगोळी काढणे, पणत्या लावणे असे सगळे झाले. सुनेने आपल्या नवऱ्याला ओवाळले, तर नातीने तिच्या बाबांना!

हो, पाडवा हा पत्नी आणि लेक या दोघींसाठीही महत्त्वाचा दिवस!

सूनबाई आरतीचे ताट ठेवणार, इतक्यात ती खुर्चीवर बसत म्हणाली,

“थांब! मला ओवाळ ना!”

एरवी, यजमान गेल्यापासून तिला स्वतःचा वाढदिवस असला तरी औक्षण करून घ्यायला आवडत नसे. हे माहीत असलेल्या सुनेला तिचे आजचे बोलणे ऐकून आश्चर्य वाटले.

सून काही बोलण्याच्याआधी तीच म्हणाली,

“अगं, आता जरी तुझे बाबा नसले तरी मी आहे ना? त्यांच्यानंतर मीच तुझी आई आणि बाबा नाही का? मग ओवाळ मला!”

सूनबाई क्षणभर भांबावून गेली. काय बोलावे, काय करावे, हेच तिला सुचेना. सासूच्या या अनपेक्षित बोलण्याने ती आश्चर्यचकित झाली होती. तरीही तिने सासूला ओवाळले.

तेव्हा तिच्या ताटात ओवाळणी टाकत ती पुन्हा प्रेमाने म्हणाली,

“अगं, आता मीच तुझी आई आणि बाबा!”

सूनबाईचे डोळे पाणावले.

दिवाळीत माहेरी गेल्यावर ती आपल्या वडिलांना आणि इकडे सासरी सासऱ्यांनाही वडील म्हणून ओवाळत असे. पण आता तिचे वडीलही नव्हते आणि सासरेही!

आज मात्र तिच्या सासूने पुढे होऊन तिच्या आयुष्यातील ती उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला होता.

तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पण ते दुःखाचे नव्हते, तर आनंदाचे, समाधानाचे होते. कारण सासूच्या रूपात तिच्यावर माया करणारे आई-वडील दोघेही जणू तिला लाभले होते.

त्या दिवशी सासुने सुनेकडून केवळ ओवाळून घेतले नव्हते, तर तिला एक नवे नाते, नवा आधार आणि प्रेमाची नवी जाणीव दिली होती.

खरंच,

.आयुष्यातील हरवलेला आनंद पुन्हा गवसतो तो अशाच एखाद्या मायेच्या क्षणातून!

स्वतः मनातून दुःखी असूनही तिने आज घरात आनंदाचे वातावरण निर्माण केले होते, दुसऱ्याला सुख आणि आनंद देण्यातच खरा आनंद असतो, हे तिने केवळ शब्दांनी नव्हे, तर स्वतःच्या कृतीतून सिद्ध केले होते.

 

प्रतिभा पिटके

अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा