You are currently viewing विद्यार्थ्यांच्या भविष्याला आधार देणारा ‘विद्यार्थी दत्तक पालक’ उपक्रम

विद्यार्थ्यांच्या भविष्याला आधार देणारा ‘विद्यार्थी दत्तक पालक’ उपक्रम

*वेंगुर्ल्यात शैक्षणिक-सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी सोहळा*

वेंगुर्ला :

समाजाच्या प्रगतीचा पाया शिक्षणात असून, त्या शिक्षणाला आधार देण्यासाठी समाजाने पुढे येणे ही आजची मोठी गरज आहे. याच सामाजिक जाणिवेतून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा वेंगुर्ला यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘विद्यार्थी दत्तक पालक उपक्रम’ या अभिनव उपक्रमाच्या *पाचव्या पर्वाचा* भव्य सोहळा *शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी दुपारी २.३० ते सायं. ५.३० या वेळेत साई डिलक्स हॉल, वेंगुर्ला* येथे आयोजित करण्यात आला आहे.

हा उपक्रम केवळ शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम नसून, शिक्षणातून सामाजिक परिवर्तन घडविण्याचा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचा एक लोकसहभागातून उभा राहिलेला प्रेरणादायी प्रयत्न आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, हीच या उपक्रमामागील मूलभूत भावना आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे वेंगुर्ला *तालुकाध्यक्ष मा. श्री. प्रसाद जाधव हे राहणार असून, उद्घाटन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस मा. श्री. राजन कोरगावकर यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमास शिक्षण सभापती, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मा. श्री. प्रीतेश राऊळ,पंचायत समिती वेंगुर्ला सभापती मा. श्री.शंकर घारे, मा.श्री.दिलीप गिरप,नगराध्यक्ष,नगरपरिषद वेंगुर्ला, मा. श्री. ओंकार ओतारी, तहसीलदार तहसील कार्यालय वेंगुर्ला. राज्य शिक्षक नेते मा.श्री.उदय शिंदे,शिक्षक समितीचे राज्य कार्याध्यक्ष मा. सयाजी पाटील , सामाजिक कार्यकर्ते श्री.जयप्रकाश चमणकर, जिल्हाध्यक्ष मा. श्री. विठ्ठल गवस, पं.स.वेंगुर्ला गटविकास अधिकारी श्री. वासुदेव नाईक, वेंगुर्ला तालुका गटशिक्षणाधिकारी श्री. संतोष गोसावी* यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच शिक्षण, प्रशासन व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या सोहळ्यात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान, दहावी-बारावीमध्ये यश संपादन केलेल्या शिक्षक समिती सदस्यांच्या पाल्यांचा सत्कार, निवृत्त शिक्षकांचा कृतज्ञता सन्मान, नवनियुक्त केंद्रप्रमुखांचा गौरव तसेच विद्यार्थी आकस्मिक निधी या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा परिचय अशा विविध प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज शिक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाचे सामूहिक उत्तरदायित्व आहे. अशा वेळी शिक्षक समितीचा हा उपक्रम समाजातील संवेदनशील व्यक्तींना शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडणारा आणि ‘एक विद्यार्थी दत्तक, एक भविष्य उज्ज्वल’ हा संदेश कृतीतून देणारा ठरत आहे.

या प्रेरणादायी कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिक्षणाच्या या लोकचळवळीला बळ द्यावे, असे आवाहन *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा वेंगुर्ला* यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा