द सहाय्यक ट्रस्ट, मुंबई व AFIF गोपुरी आश्रमाच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाला प्रारंभ; महिलांनी घराघरांत साकारल्या सेंद्रिय परसबागा
वेंगुर्ला : द सहाय्यक ट्रस्ट, मुंबई आणि सहयोगी AFIF गोपुरी आश्रम यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील परुळे बाजार ग्रामपंचायतीने ‘सेंद्रिय पोषण परसबाग’ उपक्रमाद्वारे ‘ॲनिमिया मुक्त गाव’ ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे.
या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी आपल्या घरी सेंद्रिय पोषण परसबागा विकसित केल्या आहेत. या परसबागांमधून कुटुंबाला ताजा, पौष्टिक व रसायनमुक्त भाजीपाला उपलब्ध होणार असून महिलांमध्ये आणि मुलांमधील ॲनिमियाचे प्रमाण कमी करण्यास मदत होणार आहे.
या परसबागांची पाहणी सरपंच आंबडपालकर, उपसरपंच प्राजक्ता पाटकर, ग्रामपंचायत अधिकारी शिंदे, AFIF चे जिल्हा समन्वयक मंगेश नेवगे तसेच महिला लाभार्थी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
परुळे बाजार ग्रामपंचायतीचा हा उपक्रम गावाला ‘ॲनिमिया मुक्त गाव’ बनविण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून, सेंद्रिय शेती, पोषण आणि आरोग्य यांचा प्रभावी संगम घडवून आणणारा आदर्श उपक्रम ठरत आहे.
