You are currently viewing कोकिसरेच्या शेततळ्यात मुंबईतील तरुणाचा बुडून मृत्यू

कोकिसरेच्या शेततळ्यात मुंबईतील तरुणाचा बुडून मृत्यू

कोकिसरेच्या शेततळ्यात मुंबईतील तरुणाचा बुडून मृत्यू

दारू पार्टीनंतर मित्रांसह पोहण्यासाठी उतरला; रविवारी सकाळी 15 ते 20 फूट खोल पाण्यात मृतदेह आढळला

वैभववाडी
वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे येथील सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱ्या शेततळ्यात मुंबईतील एका २४ वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. सिद्धांत प्रकाश जाधव (वय २४) असे मृत तरुणाचे नाव असून तो मुंबईतील सांताक्रूझ येथे राहत होता. त्याचे मूळ गाव कणकवली तालुक्यातील नरडवे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद वळंजू यांच्यासह मुंबईतील १४ मित्रांचा गट १० जुलै रोजी कोकिसरे येथे फिरण्यासाठी आला होता. शनिवारी (११ जुलै) दुपारी मित्राच्या घरी जेवण झाल्यानंतर सर्वांनी चिकन व दारूची पार्टी केली. त्यानंतर सायंकाळी साडेतीनच्या सुमारास कोकिसरे येथील सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱ्या शेततळ्याकडे पोहण्यासाठी गेले. काही मित्र पाण्यात उतरले, तर काहीजण काठावर बसले होते.
सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सिद्धांत जाधव दिसत नसल्याचे मित्रांच्या लक्षात आले. त्याचा मोबाईल, कपडे व चप्पल पाण्याच्या काठावर आढळून आल्यानंतर मित्रांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. गावचे सरपंच व पोलीस पाटील यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर वैभववाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. मात्र अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले.
रविवारी सकाळी पोलिस, ग्रामस्थ आणि मित्रांनी पुन्हा शोधमोहीम सुरू केली. सकाळी सुमारे ८.४५ वाजता शेततळ्यातील १५ ते २० फूट खोल पाण्यात सिद्धांत जाधव याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून वैभववाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा