You are currently viewing वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या प्रवाह – फ्लो कला प्रदर्शनाचे उद्घाटन

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या प्रवाह – फ्लो कला प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

प्रवाह – फ्लो या संकल्पनेवर आधारित कला प्रदर्शन वसंतदादा पाटील प्रतिष्ठान, शीव येथे व्हिज्युअल आर्ट कॉलेजच्या वतीने आयोजित करण्यात आले असून त्याचे शानदार उद्घाटन ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष उत्तम पाचर्णे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार काटकर, सचिव अॅड. अप्पासाहेब देसाई, उपाध्यक्ष रविंद्र घोरपडे, संकुल संचालक अशोक चव्हाण. प्राचार्य आलम शेख, अधीक्षक डॉ. मुक्तादेवी मोहिते, विभागप्रमुख डॉ. मीनल राजूरकर आदी मान्यवरांसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. हे प्रदर्शन ८ मार्चपर्यंत कलारसिकांसाठी खुले आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना उत्तम पाचर्णे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच आयुष्यात आपल्या स्वतःचे व्यक्तिमत्व कसे विकसित करावे, याची जाणीव करून दिली. आओ खेले मिट्टीमें या नावाची कार्यशाळादेखील राबविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

प्रमुख पाहुणे व हायपरकनेक्टचे सहसंस्थापक अंकुर पुजारी यांनी त्यांच्या महाविद्यालयीन दशेतील आठवणी सांगितल्या. कलाकृतींनी भारावून त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच त्यांना भविष्यात रोजगार मिळावा, यासाठीही प्रयत्नशील राहू, असे सांगितले.

अधीक्षका डॉ. मुक्तादेवी मोहिते यांनी व्हिज्युअल आर्ट कॉलेजच्या स्थापनेचा प्रवास सांगितला. ट्रस्टची स्थापना १९८१ साली झाली. त्यानंतर १९९० मध्ये इंजिनिअरिंग महाविद्यालय तर २०१९-२० मध्ये व्हिज्युअल आर्ट महाविद्यालयास सुरूवात झाली. त्यानंतर महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचाही त्यांनी आढावा घेतला

प्रतिक्रिया व्यक्त करा