लोकप्रतिनिधींचा संताप; आठ दिवसांत वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश
सावंतवाडी :
सावंतवाडी येथील आपत्ती व्यवस्थापन बैठकीत महावितरणच्या ढिसाळ कारभारावरून उपस्थित पदाधिकारी आणि वीज अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. अधिकारी फोन उचलत नाहीत आणि त्यांच्या कामावर लक्ष नाही, असा थेट आरोप करत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी वीज अधिकाऱ्यांना आमदार दीपक केसरकर यांच्या समोरच धारेवर धरले.
सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वीजेचा मोठा खेळखंडोबा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी विशेष आपत्ती व्यवस्थापन बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, या महत्त्वाच्या बैठकीला महावितरणचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख आणि कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे अनुपस्थित राहिल्याने आमदार केसरकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांना हक्कभंगाचा इशारा देण्यात आल्यानंतर अखेर ते बैठकीला उपस्थित झाले.
बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी वीज समस्येवरून महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. दोडामार्गसह इतर भागांतील नागरिक तब्बल १४ दिवसांपासून अंधारात का आहेत, असा संतप्त सवाल आमदार दीपक केसरकर यांनी केला. तसेच या गंभीर परिस्थितीची माहिती राज्याच्या ऊर्जा विभागाला का दिली गेली नाही, अशी विचारणाही त्यांनी केली.
यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विलंबाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे सांगितले. दोडामार्गची ३३ केव्ही लाईन सुरू झाली असून आंबोली, मळगाव, तळवडे, निरवडे, मळेवाड आणि वेंगुर्ले रेडी परिसरातील वीजपुरवठा पुढील एक ते दोन दिवसांत पूर्णपणे पूर्ववत होईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
या बैठकीत वनविभागाच्या कारभारावरही लोकप्रतिनिधींनी तीव्र आक्षेप घेतला. वनविभागाकडून किरकोळ फांद्या तोडल्या तरी गुन्हे दाखल केले जातात, मात्र वेळेवर फांद्या न छाटल्यामुळे वादळ-पावसात तारा तुटून अनेक गावे अंधारात बुडाल्याचा आरोप करण्यात आला.
दुसरीकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खराब रस्त्यांवरून शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले, तर जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर यांनी स्थानिक कंत्राटी कामगारांच्या तुटपुंज्या पगाराचा तसेच अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेचा मुद्दा उपस्थित केला.
बैठकीदरम्यान पदाधिकारी आणि वीज अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद होऊन अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी मध्यस्थी करत, अधिकाऱ्यांशी केवळ वाद घालण्यापेक्षा लोकांचे प्रश्न सोडवणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगत वातावरण शांत केले. येत्या आठ दिवसांत सर्व समस्या मार्गी लावण्याच्या कडक सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी आज ऊर्जा राज्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार असून, त्यात सर्व समस्या मांडण्याचे आदेश आमदार दीपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या बैठकीला नगराध्यक्ष सौ. श्रद्धा भोसले, सभापती सुष्मिता जाधव, मुख्याधिकारी विनायक औंधकर, प्रांताधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार श्रीधर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जि. प. सदस्य सुधा कवठणकर, पं. स. सदस्य जितेंद्र गावंकर, शिवसेना तालुकाप्रमुख बबन राणे, शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, चंद्रकांत जाधव, संजय गावडे, नंदन वेंगुर्लेकर, मळगाव प्रशासक हनुमंत पेडणेकर, महेश खानोलकर, बाळा जाधव, बाळ बोर्डेकर, निवृत्त कामगार अधिकारी शेखर पाडगांवकर, शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ, वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संजय लाड, नगरसेवक अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, उभादांडा जि. प. सदस्य संजय गावडे, माजी जि. प. सदस्य मंगेश तळवणेकर, राजू पनवेलकर तसेच महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद, महावितरण, वन विभाग, महसूल, पोलिस आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
