You are currently viewing कोरजाई वस्ती बसफेरी पुन्हा सुरू करण्याची मागणी; राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे कुडाळ आगार व्यवस्थापकांना निवेदन

कोरजाई वस्ती बसफेरी पुन्हा सुरू करण्याची मागणी; राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे कुडाळ आगार व्यवस्थापकांना निवेदन

कोरजाई वस्ती बसफेरी पुन्हा सुरू करण्याची मागणी; राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे कुडाळ आगार व्यवस्थापकांना निवेदन

रश्मी नाईक यांच्या नेतृत्वाखाली चर्चा; प्रवाशांच्या गैरसोयीचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी

कुडाळ

कुडाळ आगारातून अनेक वर्षांपासून सुरू असलेली कुडाळ–कोरजाई वस्ती बसफेरी अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ही बससेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या वतीने सौ. रश्मी देवेंद्र नाईक यांनी कुडाळ आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
यावेळी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे आगार कार्याध्यक्ष ॲड. राजीव कुडाळकर, उपाध्यक्ष चंद्रकांत वालावालकर, महिला संघटक सौ. रेवती राणे, सचिव मिथुन बांबूळकर तसेच कर्मचाऱ्यांचे केंद्रीय नेतृत्व रोशन तेंडोलकर उपस्थित होते.
सकाळी ९ वाजता कुडाळ आगारातून सुटणारी कवठी बसफेरी आणि दुपारी २.१० वाजता कुडाळ–कुशेवाडा मार्गे कोरजाई जाणारी बसफेरी अनेक वर्षांपासून नियमित सुरू होती. मात्र या दोन्ही बसफेऱ्या अचानक बंद करण्यात आल्याने विद्यार्थी, कामगार आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर सौ. रश्मी नाईक यांच्या नेतृत्वाखाली आगार व्यवस्थापकांसोबत सकारात्मक व यशस्वी चर्चा करण्यात आली. संबंधित बससेवा लवकरात लवकर पूर्ववत सुरू करण्याबाबत आगार प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा