“अवैध धंदेमुक्त सिंधुदुर्ग करूनच थांबणार; गुन्हेगाराचा पक्ष-जात-धर्म पाहणार नाही” – पालकमंत्री नितेश राणे
सावंतवाडीत पत्रकार परिषदेत इशारा; अणुऊर्जा प्रकल्प होणार नसल्याची पुनरुच्चार, नळपाणी योजनेच्या निकृष्ट कामांवर ब्लॅकलिस्टची चेतावणी
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बनावट दारू, ड्रग्स, मटका, जुगार आणि बीफ व्यापार पूर्णपणे नष्ट करण्याचा शासनाचा ठाम निर्धार असून, केवळ किरकोळ विक्रेत्यांवर नव्हे तर या अवैध धंद्यांच्या मुख्य सूत्रधारांवर थेट कारवाई केली जात आहे. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. त्यामुळे कारवाई करताना त्याचा पक्ष, झेंडा, जात किंवा धर्म अजिबात पाहिला जाणार नाही. अवैध धंदेमुक्त सिंधुदुर्ग करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
राणे म्हणाले, मटका, जुगार, गोवा बनावटी दारू, बीफ व्यापार तसेच गांजाची विक्री व सेवन करणाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू असून, या अवैध नेटवर्कचे धागेदोरे शासनाकडे उपलब्ध आहेत. नक्षलमुक्त देशाच्या धर्तीवर सिंधुदुर्गही सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांपासून मुक्त करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.
अणुऊर्जा प्रकल्पाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकारने आधीच भूमिका जाहीर केली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अणुऊर्जा प्रकल्प होणार नाही. पर्यावरणाला हानी पोहोचवणारा कोणताही प्रकल्प जिल्ह्यात आणला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. रोजगारासाठी बाहेर गेलेल्या तरुणांना पुन्हा जिल्ह्यात संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगत, राजकीय द्वेषातून होणाऱ्या आंदोलनांमुळे देवगड व सिंधुदुर्गची प्रतिमा मलिन होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. देवगडमधील युवकांच्या रोजगाराच्या मागणीसाठी काढलेल्या आंदोलनाचे त्यांनी कौतुकही केले.
सावंतवाडी शहराच्या विकासासाठी १८ अत्याधुनिक सुविधा, दर्जेदार क्रीडा संकुल व जिमखाना उभारण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही देत, शहराला लवकरच पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील रिक्त शासकीय पदे भरण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले.
५७ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेच्या कामाबाबत त्यांनी ठेकेदारांना कडक इशारा देत, कामाच्या दर्जात कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट केले. निकृष्ट दर्जाचे काम आढळल्यास संबंधित ठेकेदाराला थेट ब्लॅकलिस्ट करण्याची तयारी असल्याचे सांगत, या संदर्भात मंत्रालयात विशेष बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
दोडामार्ग येथील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर बोलताना नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या बंधूवर झालेल्या हल्ल्याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शासन कटिबद्ध असून, पालकमंत्री म्हणून स्वतः याकडे लक्ष देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला नगराध्यक्षा श्रद्धा भोंसले, सभापती दिपाली भालेकर, मोहिनी मडगावकर, निलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, दिलीप भालेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
